अजय वाळिंबे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाब अल्कली अँड केमिकल्स लिमिटेड (बीएसई कोड ५०६८५२)
प्रवर्तक : फ्लो टेक समूह -सुखबीर सिंग दहिया
बाजारभाव : रु. ८३/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : कॉस्टिक सोडा/ केमिकल्स
भरणा झालेले भागभांडवल : रु. ४४.१२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३१.३६
परदेशी गुंतवणूकदार ०.०१
बँक/ म्यु. फंड/ सरकार ०.०४
इतर/ जनता ६८.५९
पुस्तकी मूल्य: रु. १४.९
दर्शनी मूल्य : रु. २/-
लाभांश : –%
प्रति समभाग उत्पन्न : रु. ७.१२
पी/ई गुणोत्तर : ११.७
समग्र पी/ई गुणोत्तर: १३.६
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.१९
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ३१.७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ३९
बीटा : ०.८
बाजार भांडवल : रु. २,०२५ कोटी (मायक्रो स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : १०१/२९
वर्ष १९७५ मध्ये स्थापन झालेली पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड ही उत्तर भारतातील सर्वात मोठी ‘कॉस्टिक सोडा’ उत्पादक कंपनीआहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड, लिक्विड क्लोरिन, सोडियम हायपोक्लोराइट आणि हायड्रोजन गॅस ही कंपनीची इतर उत्पादने आहेत.
पंजाब अल्कलीजची मेम्ब्रेन सेल तंत्रज्ञानावर आधारित दोन युनिट्स असून युनिट-१ ची क्षमता १०० टन प्रती दिन तर युनिट-२ ची २०० टन प्रति दिन आहे. सध्याची एकत्रित वार्षिक क्षमता ९९,००० टन कॉस्टिक सोडाची आहे. ही दोन्ही युनिट्स भाक्रा लेफ्ट बँक पॉवर जनरेटिंग स्टेशनजवळ (मोक्याच्या जागी) असून त्यामुळे कंपनीला अखंडित वीज पुरवठा आणि अखंडित पाणी पुरवठा होतो. कॉस्टिक सोडा उत्पादांनासाठी ही दोन्ही महत्त्वपूर्ण इनपुट आहेत.

कॉस्टिक सोडा बऱ्याच उत्पादांनासाठी उदाहरणार्थ, साबण, कागद, रंग, रसायने, ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक यासारख्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कंपनीचे दुसरे उत्पादन हायड्रोक्लोरिक आम्ल हे मुख्यत्वे ऊर्जा आणि खतांच्या वनस्पतींमध्ये पाण्याचे अखनिजीकरण, धातूचे पिकलिंग, विविध धातूचे क्लोराईड तयार करणे इ. साठी वापरले जाते तर लिक्विड क्लोरीन हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, पेपर मॅन्युफॅक्चरिंग, स्टेबल ब्लीचिंग पावडर, सीपीडब्ल्यू आणि पीव्हीसी क्लोरोमेथेन्स आणि इतर क्लोर-ऑर्गेनिक रसायनांमध्ये वापरले जाते. कंपनीची उर्वरित उत्पादने म्हणजे सोडियम हायपोक्लोराइट आणि हायड्रोजन हे अनुक्रमे कापड ब्लीचिंग, लाँड्री ट्रेड, वनस्पती तेलांचे हायड्रोजनेशन, ऑप्टिकल फायबर युनिट्स इ. साठी वापरले जातात.

कंपनी स्वतःच्या अंतर्गत निधी स्रोतातून आधुनिकीकरण तसेच विस्तारीकरण कार्यक्रम राबवत असून लवकरच तिची उत्पादन क्षमता ३०० टन प्रतिदिन या सध्याच्या क्षमतेवरून ८०० टन प्रतिदिन अशी अडीच पटींनी वर जाईल. तसेच कंपनी ७५ मेगावॅट कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्याच्या प्रक्रियेत आहे. या व्यतिरिक्त, हायड्रोजन आणि क्लोरीनचा वापर इष्टतम करण्यासाठी, कंपनीची हायड्रोजन पेरोक्साइड आणि एसबीपी प्लांट्सची स्थापना करण्याची योजना आहे.सप्टेंबर २०२२ साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी करून दाखवली असून या कालावधीत कंपनीने १८६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ३७ कोटी रुपयांचा तोटा केला होता.

‘कॉस्टिक सोडा उत्पादनासाठी अव्याहत विजेची तसेच पाण्याची गरज असते. सध्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा वापर करण्यावर मर्यादा आली असून विजेच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. तसेच चीनमध्ये अजूनही कोविडसदृश वातावरण आणि रसायनिक कंपन्याना उत्पादनांवर मर्यादा आहे. जवळपास सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात कॉस्टिक सोड्याचा वापर होत असल्याने त्याला देशांतर्गत तसेच देशाबाहेर मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

भारतात पंजाब अल्कलीज खेरीज मेघमणी फाइन-केम तसेच याच स्तंभात पूर्वी सुचवलेल्या टीजीव्ही स्राक आणि गुजरात अल्कलीज या मोठ्या ‘कॉस्टिक सोडा’ उत्पादक कंपन्या आहेत. आगामी दोन वर्षे ही या कंपन्यासाठी उत्तम असतील. सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemicals that make china out of competition punjab alkali chemicals limited tmb 01