Post Office scheme : मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं, यासाठी सरकारकडून अनेक चांगल्या योजना राबवल्या जातात. यामध्ये गुंतवणूक करून मुलांचे भविष्य तर सुरक्षित होतेच, तसेच पालकांना चांगला परतावा मिळतो, ज्याच्या मदतीने ते मुलांचे शिक्षण, लग्न यांसारखे मोठे खर्च सहज भागवू शकतात. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी खास मुलांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही छोटीशी गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. बाल जीवन विमा असे या योजनेचे नाव आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया…
बाल जीवन विमा (Child Life Insurance) म्हणजे काय?
पोस्ट ऑफिसची बाल जीवन विमा योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येते. ही योजना खास मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ५ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा जीवन विमा करता येतो. कोणताही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी हा विमा घेऊ शकतो. योजना घेताना पालकांचे कमाल वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. याचा अर्थ असा की, जर तुमचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी हा विमा घेऊ शकत नाही. ही पॉलिसी घेताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही. पॉलिसी स्वीकारल्यापासून मुलाला संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. पॉलिसी घेतल्यानंतर पालकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागणार नाही. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर विमा रकमेसह बोनसची रक्कम दिली जाते.
विमा संरक्षण किती उपलब्ध आहे?
यामध्ये जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम पेमेंटचा पर्याय निवडू शकता. बाल जीवन विम्यामध्ये १००० रुपयांच्या विमा रकमेवर प्रति वर्ष ५२ रुपये बोनस दिला जातो.
फायदा कसा घ्यावा?
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बाल जीवन विमा मिळवू शकता. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकता.
हेही वाचाः बँक एफडीपेक्षाही पोस्टातील आता ‘या’ योजनेत मिळणार ७ टक्क्यांच्या जवळपास परतावा