सरलेल्या आठवड्यात, अमेरिकेतील महागाई दराच्या जाहीर आकड्यांमधील अपेक्षेपेक्षा सरस दिसून आलेल्या उतार दिलासादायी आणि बाजाराचा मूडपालटास उपकारक ठरला. जगभरात सर्वत्रच भांडवली बाजारात नवचैतन्य संचारलेले दिसून आले. त्या त्या बाजारपेठांचे निर्देशांक उच्चांकी स्तर गाठताना दिसून आले. येत्या आठवड्यात भारतासह अन्य प्रमुख बाजारपेठांचा जाहीर होऊ घातलेल्या महागाई दराच्या आकड्यांनी कस लागेल. भारताबाबत व्यापार तुटीची स्थिती दर्शविणारी आकडेवारीही येऊ घातली आहे. कंपन्यांचा निकाल हंगाम जवळपास शेवटाकडे आहे. दुसरीकडे नवनव्या कंपन्यांच्या ‘आयपीओ’ची रेलचेल मात्र बाजारातील उत्साह कायम राखण्यास मदतकारक ठरण्याचा अंदाज आहे.
सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२
1.तिमाही निकाल – भारत फोर्ज, बायोकॉन
2.आयपीओ – कीस्टोन रिअँल्टर्स लिमिटेड (रुस्तमजी) प्रारंभिक भागविक्रीचा पहिला दिवस
3.किरकोळ महागाई दर : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत भारतातील चलनवाढीचा दर अर्थात किरकोळ महागाई दराच्या ऑक्टोबरच्या आकड्यांची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. ऑगस्टमधील ७ टक्क्यांवरून, सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांच्या चढासह पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला हा दर यंदा उतार दाखविण्याची अपेक्षा आहे. बाजारातील सार्वत्रिक अंदाज तो ७.३ टक्क्यांपेक्षा जास्त न राहावा असा आहे.
4.घाऊक महागाई दर : भारतातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची आकडेवारीही एकाच दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे. ऑगस्टमध्ये १२.४१ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये १०.७० टक्क्यांवर उतरलेला हा दर बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे ११.५ टक्के अथवा कमी राहू शकेल.
5.ओपेक अहवाल: तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना – ओपेककडून आपला मासिक अहवाल प्रसिद्ध करेल. ज्यात जगातील तेलाची मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या घडामोडींचे तपशीलवार विश्लेषणही मांडले जाईल.
मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२
1. भारताची व्यापार तूट – ऑक्टोबरसाठी भारतातील निर्यात व आयातीतील तफावत अर्थात व्यापार तुटीची आकडेवारी जारी केली जाईल. ऑक्टोबरमध्ये ती नवीन विक्रमी स्तर गाठेल की उतार दर्शविणारा दिलासा देईल, हे पाहावे लागेल.
2.चीनमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी
बुधवार, १६ नोव्हेंबर २०२२
1.ब्रिटनमधील महागाई दर : ब्रिटनमधील वार्षिक चलनवाढ ऑगस्टमधील ६.३ टक्क्यांवरून, सरलेल्या सप्टेंबरमध्ये ६.५ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आणि ऑक्टोबरसाठी तिचा दर हा बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे ६.४ टक्के वा कमी असेल हे त्या दिवशी जाहीर होणारे आकडेच स्पष्ट करतील.
2. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादन : अमेरिकेमधील औद्योगिक उत्पादन सप्टेंबरपासून वाढत आहे, कळीचा प्रश्न हाच की, ही गती कायम राखली जाईल काय?
गुरुवार, १७ नोव्हेंबर २०२२
युरोपीय महासंघासाठी चलनवाढीच्या दराचे आकडे
शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०२२
1.भारताची परकीय चलन गंगाजळी : रिझर्व्ह बँकेकडून देशातील परकीय चलन गंगाजळीची, ४ नोव्हेंबरपर्यंतची स्थिती दर्शविणारा पाक्षिक अहवाल सादर केला जाईल.
2. बँक ठेवी आणि पतपुरवठ्यातील वाढ : रिझर्व्ह बँकेकडून ४ नोव्हेंबरला संपलेल्या पंधरवड्यात देशातील सर्व बँकांमध्ये दिसून आलेला कर्ज आणि ठेव वाढीचा दर जारी केला जाईल. आधीच्या पंधरवड्यात, म्हणजे २१ ऑक्टोबरपर्यंत बँकांकडून वितरीत कर्जाचे मूल्य १७.९० टक्के दराने वाढल्याचे आणि ठेवींमध्ये ९.६ टक्के वार्षिक वाढ दिसून आली आहे.