अमेरिकी म्युच्युअल फंड उद्योगाला २०२४ सालात १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. या उद्योगात जॅान सी. बॉगल नावाचा माणूस अवतरला आणि तोच पुढे म्युच्युअल फंड उद्योगासाठी तेजाब बनला. या माणसाने त्याच्या कारकिर्दीत म्युच्युअल फंड उद्योगावर कडाडून टिका केली. नुसतीच टिका केली असे नाही तर समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे, “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले” ही ओळ म्युच्युअल फंड उद्योगात फक्त याचं माणसाला लागू पडेल . जन्म ८ मे १९२९ आणि १६ जानेवारी २०१९ रोजी मृत्यू अशी तब्बल ८९ वर्षांची याची कारकिर्द. म्युच्युअल फंड उद्योगात हा माणूस १९५१ पासून कार्यरत होता. या व्यक्तीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना कोणती हमी दिली हे सांगितले तर ते हास्यास्पद वाटेल.
“आम्ही गुंतवणूकदारांना बाजाराच्या वाढीपेक्षा जास्त वाढ मिळवून देणार नाही.” वाचकांनी हे वाक्य पुन्हा एकदा वाचावे. सध्या अनेक म्युच्युअल फंड सुरुवातीपासून ते आतापावेतो निर्देशांकापेक्षा गुंतवणूकदारांना आम्ही जास्त मिळवून दिले आहे याची वारेमाप जाहिरात करतात, ती किती चुकीची आहे ते कळेल. वास्तविक पाहता सेबीने म्युच्युअल फंड योजनांची वर्गवारी सक्तीची केली. ती मुख्य तारीख विचारात घेऊन मगच योजनांच्या कामगिरीचा उल्लेख करायला हवा. परंतु आता आहे ते ठीक मानायचे.
हेही वाचा : आता भारतातून बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय
जॉन बॉगल यांनी व्हॅनगार्ड म्यु्च्युअल फंडाची १९७४ मध्ये स्थापना केली आणि १९९६ पर्यंत या फंड घराण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःच धुरा सांभाळली, तर २००० सालापर्यंत ते अध्यक्षपदावर कार्यरत होते. ‘फार्च्युन’ने २० व्या शतकातील चार ‘गुंतवणुकीतील महान ताऱ्यां’मध्ये त्यांचा समावेश केला, तर २००४ सालात ‘टाइम’ने जगातील अव्वल १०० सर्वशक्तिमान आणि प्रभावी व्यक्तींमध्ये त्यांना स्थान दिले.
‘इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर’ने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. बॉगल लिखित सातवे पुस्तक ‘इनफ’, हे २००७ सालातील ‘द लिटल बुक कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग’प्रमाणे त्या समयीचे लोकप्रिय बेस्टसेलर ठरले. त्यांनी स्थापित केलेल्या बॉगल फायनान्शियल मार्केट रिसर्च सेंटरचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.
हेही वाचा : विश्लेषण: दिवाळीपर्यंत सोने ६२००० रुपयांवर जाण्याची शक्यता, सोन्याच्या दरवाढीची कारणे काय?
वेलिग्टंन मॅनेजमेंट या संस्थेमुळे १९५१ सालात बॉगल यांचा म्युच्युअल फंड उद्योगाशी संबंध आला. १९७५ ला जगातील पहिला इंडेक्स म्युच्युअल फंड जन्माला आला. वाचकांच्या हे लक्षात आले असेल की जॅान बॉगल इंडेक्स फंडाचा कट्टर पुरस्कर्ता होता. पुढे ७ फेब्रुवारी १९७७ ला ‘नो लोड फंड’ आला आणि अमेरिकी म्युच्युअल फंड उद्योग प्रचंड वेगाने मोठा झाला. कोणत्याही देशात म्युच्युअल फंडाच्या मालमत्ता आणि देशाचे सकल उत्पन्न याची टक्केवारी यावरून त्या देशात म्युच्युअल फंड किती वाढला किंवा अजून वाढायला वाव आहे हे बघितले जाते. ‘नो लोड फंड’ विरुध्द ‘लोड फंड’ याचा अमेरिकेत वर्षानुवर्ष संघर्ष चालू होता. बॉगल अर्थातच ‘नो लोड फंड’ आणि ‘इंडेक्स फंड’ यांचेच गुणगान गाणाऱ्यांमध्ये अग्रणी होते. इंडेक्स फंडाची कास धरणारा त्यांचा व्हॅनगार्ड म्युच्युअल फंड कशाप्रकारे मोठा झाला याची भरपूर माहिती उपलब्ध आहे.
त्यानंतर मग हेज फंड बाजारात आले. या फंडाच्या व्यवस्थापकांनी बाजारात धुमाकूळ घातला. अवाढव्य वेतन, नफ्यातला वाटा काढून घेतला आणि नंतर नुकसान झाल्यानंतर हात वर केले. यामुळे अमेरिकी म्युच्युअल फंड उद्योगात बॉगलच्या विचारसरणीशी सहमत होणाऱ्यांची संख्या वाढू लागली. परंतु त्यामुळे अनेकांच्या हितसंबंधाना बाधा निर्माण होऊ लागली. “पळा पळा कोण पुढे पळे तो” या विचारसरणीमुळे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक सुध्दा योजनेसाठी चांगल्या शेअर्सची निवड करा आणि ते शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी सांभाळा. हे गुंतवणुकीचे मूलतत्व विसरले .
हेही वाचा : गुंतवणुकीत जोखीम व्यवस्थापन गरजेचेच…
१९५१ ला फंडाचा व्यवस्थापक सरासरी १६ वर्षे शेअर्स सांभाळत होता. तो कालावधी चार वर्षापर्यंत खाली आला. या खरेदी विक्रीमुळे गोळा होत असलेल्या फी मुळे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे उत्पन्न वाढले. परंतु गुंतवणूकदारांना मिळणारी भांडवल वृध्दी कमी होत गेली. योजनेची माहिती छापताना योजनेला जी माहिती प्रसिध्द करायला लागते, ती माहिती गणिती विचाराने १०० टक्के बिनचुक असेल सुध्दा, परंतु गुंतवणूकदाराला मिळणारी भांडवली वाढ आणि योजनेची वाढ यात प्रचंड मोठी तफावत दिसून येते. गुंतवणूकदार योजनेशी एकनिष्ठ राहिलेला नसतो, असे कारण सांगितले की म्युच्युअल फंड आपले हात झटकतो. परंतु बॉगलचे जे स्वप्न होते ते असे होते की, म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर योग्य मोबदला मिळेल. दुसरे स्वप्न असे होते की, म्युच्युअल फंड उद्योग गुंतवणूकदाराला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तेजन देईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचे नियम पाळून योजनांचे व्यवस्थापन चांगल्या तऱ्हेने होत आहे याची त्यांना खात्री पटेल आणि यात त्यांचा सहभाग वाढेल, अशी त्यांची धारणा होती.
ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या शेअर्सची बाजारात नोंदणी असेल तर म्युच्यु्अल फंडाच्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांचे भागधारक होता येईल, पारदर्शकता वाढेल. परंतु अलिकडे नोंदणी करण्याऐवजी, नोंदणी करण्याची गरज नाही, अशा प्रकारचे निर्णय होऊ घातलेत. पराग पारिख म्युच्यु्अल फंडासारखा एखादा म्युच्युअल फंड योजनेच्या गुंतवणूकदारांची वार्षिक सभा घेण्याचे धाडस करतो. बाकी आनंदी आनंद आहे. ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या त्यांचे वार्षिक अहवाल अशा प्रकारे प्रसिध्द करतात की ते वाचूच नयेत, असेच ठरविलेले असते. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाला जॅान सी बॉगल सारख्या माणसाची गरज आहे..