मुंबई : सरलेल्या ऑक्टोबरमध्ये इक्विटी अर्थात समभागसंलग्न म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ओघ घसरून ९,३९० रुपयांवर सीमित राहिला. सप्टेंबरमध्ये या फंडातील प्रवाह १४,०७७ कोटी रुपयांवर होता. मात्र गुंतवणुकीचा सर्वतोमुखी पर्याय बनलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून ऑक्टोबरमधील योगदान १३,००० कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ‘अॅम्फी’द्वारे जाहीर मासिक आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १२,९७६ कोटी रुपये असलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीने ऑक्टोबरमध्ये अभूतपूर्व १३,०४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
चालू वर्षात मे महिन्यापासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक १२,००० कोटी रुपयांच्या पुढे कायम आहे. मे महिन्यात १२,२८६ कोटी रुपये, जूनमध्ये १२,२७६ कोटी रुपये तर जुलै महिन्यामध्ये १२,१४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यांत म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये ११,८६३ कोटी रुपयांचा ओघ आला होता.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण ८७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक ‘एसआयपी’मार्फत केली आहे. मागील म्हणजेच २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण १.२४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून झाली होती.
देशातील ४३ म्युच्युअल फंड घराण्यांनी ऑक्टोबर महिन्यात इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडांमध्ये ९,३९३ कोटी रुपयांचे योगदान मिळविले. जे मासिक तुलनेत घटले असले तरी मार्च २०२१ पासून सलग २० व्या महिन्यात इक्विटी फंडांमधील ओघ सकारात्मक राहिला आहे. त्याआधी जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ या आठ महिन्यांत इक्विटी फंडांमधून ४६,७९१ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला होता. याव्यतिरिक्त, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) ऑक्टोबरमध्ये १४७ कोटी रुपयांचा ओघ दिसला, जो मागील महिन्यात ३३० कोटी रुपये होता. दुसरीकडे रोखेसंलग्न अर्थात डेट म्युच्युअल फंडांमधून सप्टेंबरमध्ये ६५,३७२ कोटींची गुंतवणूक आटली, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्गुंतवणुकीचे प्रमाण केवळ २,८१८ कोटी रुपयांवर सीमित राहिले.
खात्यांच्या संख्येचाही विक्रम
सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात ‘एसआयपी’ खात्यांची (फोलिओ) संख्या ९.५२ लाखांनी वाढून ५.९३ कोटी अशा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तर एकूण म्युच्युअल फंड फोलिओच्या संख्येने ऑक्टोबर महिन्यात १३.९१ कोटींचा नवा उच्चांक गाठला आहे. म्युच्युअल फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) ३९.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी सप्टेंबरच्या अखेरीस ३८.४ लाख कोटी रुपये होती.
गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक
जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांकडून जगभरात सुरू असलेली व्याज दरवाढ याचा देशांतर्गत भांडवली बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास कायम असून त्यांनी ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ वाढवला आहे. यामुळे समभागसंलग्न फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता आणि एकूण फोलिओंच्या संख्येतही भर पडली आहे.- एन. एस. व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘अॅम्फी’