ED Case Bhushan Steel : दिवाळखोर पोलाद कंपनी भूषण स्टीलचे प्रवर्तक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नीरज सिंघल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय ५६,००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याची चौकशी करीत आहे. ईडीने आधी नीरज सिंघल यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने नीरज सिंघल यांना २० जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, भूषण स्टील आणि त्यांच्या चालकांविरुद्ध फसवणुकीची गंभीर तक्रार तपास कार्यालयात दाखल करण्यात आलीय. त्या तक्रारीवरूनच ईडीनं त्यांना अटक केलीय. या तक्रारीत नीरज सिंघल यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. नीरज सिंघल यांच्यावर शेल कंपन्या निर्माण करणे आणि त्या माध्यमातून अनेक व्यवहार दाखवून कंपनीच्या पैशांची अफरातफर करणे असे आरोप आहेत. विशेष म्हणजे शेल कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेला पैसा मालमत्ता खरेदीसाठी आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरला गेल्याचा संशय आहे. भूषण स्टीलचे प्रवर्तक/संचालक आणि अधिकारी यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून बँकांना सवलतीच्या दरात क्रेडिटचे पत्र जारी केले. कंपनीचा हा निधी त्यांनी आपल्याच कंपन्यांमध्ये गुंतवला, असंही ईडीचे म्हणणे आहे.

एसबीआय, पीएनबीला तोटा सहन करावा लागला

जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या नावे बनावट पत्रे तयार करून बँकांकडून मिळालेला निधी वळवण्यात आल्याचे ईडीला त्यांच्या तपासात आढळून आले. नंतर ते भूषण स्टील आणि इतर सहयोगी कंपन्यांकडे वळवण्यात आले. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला मोठा फटका सहन करावा लागला.

हेही वाचाः घर खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ८ बँकांमध्ये स्वस्त गृहकर्ज उपलब्ध, नवे दर तपासा

टाटा स्टीलकडे सध्या ताबा

दिवाळखोरी कायद्यांतर्गत भूषण स्टीलवर ही कारवाई करण्यात आली. कंपनीचे कामकाज मे २०१८ मध्ये टाटा स्टीलकडे आले होते. टाटा स्टीलने कंपनीवरील बँकांच्या थकीत ३५,२०० कोटी रुपयांपैकी जवळपास दोन तृतीयांश रक्कम परत केली आहे. तसेच गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने ऑगस्ट २०१८ मध्ये गंभीर कॉर्पोरेट फसवणुकीच्या आरोपाखाली सिंघल यांना अटक केली.

हेही वाचाः भारताने डिजिटल पेमेंटमध्ये केला नवा विक्रम, जागतिक व्यवहारात ४६ टक्के वाटा