Elon Musk Net Worth: अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय होताच त्यांचे खंदे समर्थक असलेल्या एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मस्क यांची संपत्ती एका दिवसात २६.५ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला होता. मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी १३० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. तसेच एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ होऊन निवडणुकीच्या निकालानंतर ती २९० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
मस्क यांच्या टेस्ला या कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची वाढ झाली. टेस्लाचे शेअर वर्षभरापासून तेजीत आहेत. मागच्या वर्षीय टेस्लाच्या शेअरमध्ये ३२ टक्क्यांची वाढ झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी मस्क यांनी पाठिंबा दिला असल्यामुळे पुढील पाच वर्ष मस्क यांचा धोरणांवर प्रभाव असेल असा अंदाच व्यक्त करून गुंतवणूकदार टेस्लामध्ये गुंतवणूक करत आहेत.
हे वाचा >> डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गुंतवणूकदारांना असेही लाभ-तोटे!
ट्रम्प यांच्या विजयामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत
ट्रम्प यांच्या विजयामुळे फक्त मस्क यांच्याच संपत्तीत वाढ झाली असे नाही. तर जगातील सर्वात श्रीमंत १० व्यक्तींच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे दिसले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या विजयानंतर जगातील श्रीमंत सर्वात १० श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत ६३.५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मस्क यांच्याबरोबर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, ऑरॅकलचे लॅरी एलिसन यांना सर्वाधिक लाभ झाला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या स्थानावर एलॉन मस्क, दुसऱ्या स्थानावर जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानावर एलिसन आहेत.
टेस्लाच्या शेअरची किंमत २९८ डॉलरवर पोहोचली आहे. जर मागच्या दोन दिवसांप्रमाणे टेस्लाच्या शेअरला उसळी मिळाली लवकरच हा शेअर ३०० डॉलरच्या वर जाऊ शकतो. मागच्या पाच वर्षांत टेस्लाच्या शेअरने १०५४ टक्क्यांचा परतावा दिला आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिले जाणारे अनुदान कमी होऊ शकेल, ज्यामुळे टेस्ला कंपनीचा फायदा होणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे.