Layoff Video : एका महिला कर्मचाऱ्याने स्वत:ला नोकरीवरून काढून टाकल्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओने कंपनीचे सीईओही भावूक झाले. हा व्हिडीओ वेदनादायक असल्याचे सांगून ते म्हणाले की, नोकर कपातीची प्रक्रिया आता तरी सुधारली पाहिजे. महिला कर्मचाऱ्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ कॉलवरच नोकरीवरून काढून टाकले
खरं तर सॅन फ्रान्सिस्कोमधील सायबर सुरक्षा कंपनी क्लाउडफ्लेअरने गेल्या आठवड्यात सुमारे ६० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. हे कर्मचारी योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावेळी ब्रिटनी पिश नावाच्या महिला कर्मचाऱ्यालाही व्हिडीओ कॉल करून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ब्रिटनीने तिच्या घरातून तिला नोकरीवरून काढून टाकल्याचा एक व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला. हा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला आणि त्याला २१ लाख व्ह्यूज मिळाले. जेव्हा कंपनीचे सीईओ मॅथ्यू प्रिन्स यांनी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ते भावूक झाले. त्यांनी लिहिले की, हे खूपच वेदनादायक आहे.
…अन् कंपनीच्या एचआरकडे प्रश्नांची उत्तरे नव्हती
व्हिडीओ कॉलवर कंपनीच्या एचआरने ब्रिटनीला सांगितले की, तिला असमाधानकारक कामगिरीमुळे काढून टाकण्यात आले आहे. पण जेव्हा तिने कारण विचारले तेव्हा एचआर ब्रिटनीला योग्य उत्तरही देऊ शकला नाही. ब्रिटनी म्हणाली की, आतापर्यंत माझ्या मॅनेजरने मला नेहमीच चांगले रिव्ह्यू दिलेत. जेव्हा ब्रिटनीला काढून टाकण्यात आले, तेव्हा तिच्या मॅनेजरलाही विचारणा करण्यात आली नसल्याचं समजतंय. यानंतर ब्रिटनीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने सांगितले की, मी तुमच्या निर्णयावर समाधानी नाही. तुम्ही मला पूर्ण माहिती द्या.
महिला कर्मचाऱ्याच्या डोळ्यात आले पाणी
ब्रिटनी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली की, तुमच्यासाठी लोकांना काढून टाकणे खूप सोपे काम आहे. तुम्ही १० ते १५ मिनिटांत एखाद्याला सांगाल की, त्याला त्याच्या नोकरीवरून काढून टाकले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात किती मोठा गोंधळ निर्माण होतो. परंतु तुमच्याकडे एखाद्याला काढून टाकण्याचे योग्य कारणदेखील नाही.
कंपनीच्या सीईओने चूक मान्य केली
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर नोकर कपातीबाबत वाद सुरू झाला. लोकांनी कंपनीवर विविध प्रकारचे आरोप केले. क्लाउडफ्लेअरने सांगितले की, कोणत्याही कर्मचार्यांना विनाकारण काढून टाकण्यात आले नाही. कंपनीचे सीईओ प्रिन्स यांनी कबूल केले की, नोकर कपातीची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला हवी. असे निर्णय घेताना एचआरने व्यवस्थापकालाही विचारणा करायला हवी. नोकर कपात केलेले कर्मचारी वाईट नाहीत. त्यावेळी कंपनीकडे त्यांच्यासाठी कोणतेही काम नसते. भविष्यात कंपनी अधिक चांगले काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.