दिग्गज टेक कंपनी Apple आता वर्क फ्रॉम होम संपवण्याच्या मार्गावर आहे. जे कर्मचारी आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा कंपनीने इशारा दिला आहे. खरं तर जे कर्मचारी कार्यालयात येत नाहीत, त्यांचीही नोकरी जाऊ शकते. Apple बॅज रेकॉर्डद्वारे कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवत आहे. करोना संपल्यानंतरही अनेक कर्मचारी कार्यालयात येऊन काम करण्यास तयार नाहीत. कंपनीने त्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे.
Apple आता ही सूट देण्याच्या मूडमध्ये नाही. घरून काम केल्यामुळे कंपनीची उत्पादकता कमी होत असल्याचे कंपनीचे मत आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, करोनाच्या कठीण काळातही कर्मचाऱ्यांनी घरी बसून काम केले आणि आपले लक्ष्य साध्य केले. म्हणूनच कंपनीने घरून काम करणं पूर्णतः संपवू नये, असं कर्मचाऱ्यांना वाटतं.
तर त्यांची नोकरी जाऊ शकते
अॅपलने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे, जे आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येत नाहीत, अशी माहिती न्यूज वेबसाइट प्लॅटफॉर्मरचे व्यवस्थापकीय संपादक जो शिफर यांनी अलीकडेच एका ट्विटमध्ये दिली. अॅपलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवसांत किमान तीन दिवस कामावर यावे लागेल, असे गेल्या वर्षी अॅपलने जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा कंपनीने त्याची पुनरावृत्ती केली आहे. पण यावेळी अॅपलने खूपच कडक भूमिका घेतली आहे. यावेळी आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कंपनी कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दर आठवड्याला कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत मंगळवार आणि गुरुवारी कार्यालयात यावे लागेल. उर्वरित एक दिवसाची निवड टीम लीडर करणार आहे.
म्हणून कर्मचारी आंदोलन करतायत
कंपनीच्या या निर्णयावर अॅपलचे कर्मचारी नाराज आहेत. कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी घरातूनही कंपनीसाठी बरेच चांगले काम केले आहे. मार्च २०२२ मध्ये कंपनीच्या हायब्रीड वर्क कल्चरची घोषणा करताना,सीईओ टिम कुक यांनी रिमोट वर्क हे सर्व प्रयोगांची जननी म्हणून वर्णन केले. तसेच काम करण्याचा हा एक चांगला मार्ग नसल्याचंही अधोरेखित केलं होतं.