गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, महागाई, घसरणारा रुपया यांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात सोने-चांदीची वाटचाल कशी राहू शकते याबाबत पीएनजी ॲण्ड सन्सचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कमॉडिटी बाजार-तज्ज्ञ अमित मोडक यांच्याशी झालेली ही विशेष बातचीत…
सध्या सोन्याच्या दरावर नक्की कोणत्या गोष्टींचा परिणाम होत आहे?
जगभरात घडणाऱ्या अनेक घटनांचे पडसाद सोने भाव वर-खाली होण्यावर उमटत आहेत. यातील प्रमुख घटक रशिया-युक्रेन युद्ध हा आहे. यावर तोडगा निघेल अशी चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी रशियातील एक पूल पाडला गेला आणि त्यात युक्रेनचा हात असेल, असे गृहीत धरून रशियाने युक्रेनच्या विविध भागांत क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला केला. त्यात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालयही लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे दोघांमधील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता वाढत आहे. चीनने तैवानवरील अधिकाराबाबत आपली भूमिका पुन्हा उघडपणे जाहीर केली आहे. एकंदरीत वाढत्या भू-राजकीय तणावांच्या परिणामी, अन्नधान्यांसह वस्तू व सेवांच्या पुरवठ्याची करोना संकटापासून विस्कटलेली घडी ताळ्यावर येण्याची शक्यताही लांबणीवर पडत चालली आहे. जागतिक पातळीवर महागाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती आहे. याचा परिणाम चलनावर अन् पर्यायाने सोन्याच्या भावावर होणार आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हकडून होणारे व्याजदर बदल हेही सोन्याचे भाव वर-खाली होण्यास कारणीभूत ठरत आहेत.
चलन व महागाई यांचा सोन्याशी संबंध कसा?
रशिया-युक्रेन युद्ध आणि बाह्य अस्थिरता यांच्यामुळे प्रामुख्याने तेलबिया, खनिज तेल, गहू अशा महत्त्वाच्या गोष्टींचा जागतिक बाजारपेठेतील पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचे पडसाद युरोपात दिसू लागले आहेत. ब्रिटनमध्येही महागाईने आधीचे सर्व उच्चांक मोडले आहेत. त्यातच परिस्थिती आणखी चिघळल्यास जागतिक बाजारपेठेत अन्नधान्य, तेल यांची भाववाढ होणार. त्यामुळे चलनवाढ वा महागाई होणार म्हणजेच सोन्याचा भाव वाढणार. ब्रिटन व युरोपमध्ये डिसेंबर-जानेवारीमध्ये मंदी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेथील झळीचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल. त्यामुळेच सोन्यात तेजी येऊ शकते. कारण आर्थिक अस्थिरतेत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. परिणामी सोन्याची भाववाढ होते. यापूर्वीही असेच झाले आहे.
पण पूर्वापार रीतीप्रमाणे, डॉलर मजबूत झाल्याने सोन्यात घसरण होत असते?
डॉलरचा ‘डॉलेक्स’ वाढत असून, तो ४० वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. डॉलरचे विनिमय मूल्य अन्य चलनांच्या तुलनेत वाढत चालले आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर याचा विपरीत परिणाम निश्चितच होऊ शकतो. म्हणजेच सोन्यावर परिणाम करणारे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही घटक सध्या अस्तित्वात आहेत. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह ही मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवत आहे. गेल्या दोन बैठकांमध्ये त्यांनी पाऊण-पाऊण टक्का वाढ केली आहे. आगामी बैठकीत फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदरात पाऊण टक्का (म्हणजे ७५ आधार बिंदू) वाढ केल्यास सोन्याच्या भावात घसरण होऊ शकते. कारण डॉलरला मागणी वाढल्यास तेथील बाँडचे यील्ड (परतावा) आणि ‘डॉलेक्स’ वाढेल अन् त्याचा परिणाम सोन्यावर होऊ शकतो.
सोन्याच्या पुढील वाटचालीबद्दल काय सांगाल?
महागाई, युद्ध, डॉलरचे मूल्य, फेडरल रिझर्व्हचा अपेक्षित निर्णय आदी सर्व गोष्टी गृहीत धरल्या तरीही सोन्याचे भाव रोजच्या रोज ठरत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच, सोन्यावर त्या त्या वेळेला जो जास्त महत्त्वाचा घटक असेल तो परिणाम करतो. गुंतवणूकदार म्हणून आपण सोन्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहणे आवश्यक आहे. येथून पुढील दोन ते तीन वर्षांत सोन्यात दहा ते बारा टक्के परतावा मिळण्याची शक्यता वाटते.