प्रवीण देशपांडे
कलम ५४ नुसार घर आणि त्याला संलग्न जमिनीच्या विक्री केल्यानंतर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी नवीन घरात कशी गुंतवणूक करावी हे आपण यापूर्वीच्या लेखात बघितले. आता या लेखात कलम ‘५४ ईसी’नुसार जमीन आणि इमारतीची विक्री आणि कलम ‘५४ एफ’नुसार कोणत्याही संपत्तीची (निवासी घर सोडून) विक्री केल्यास त्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी काय तरतुदी आहेत आणि त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते याविषयीच्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी खालीलप्रमाणे :
१. कलम ‘५४ ईसी’ : ज्या करदात्यांनी जमीन किंवा इमारतीची (मूळ संपत्ती) विक्री केली आहे अशांनी या कलमानुसार ठरावीक रोख्यांमध्ये गुंतवणूक करून त्याची वजावट घेतल्यास कर वाचू शकतो. ही वजावट देखील दीर्घमुदतीच्या भांडवली संपत्तीसाठी आहे. या कलमानुसार मूळ संपत्तीची विक्री केल्या तारखेपासून ६ महिन्यात ठरावीक रोख्यांमध्ये दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याची गुंतवणूक केल्यास त्याची वजावट घेता येते. या ठरावीक रोख्यांमध्ये गुंतवणुकीला मर्यादा आहे. या कलमानुसार ही मर्यादा ५० लाख रुपये इतकी आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा त्यापेक्षा जास्त मूळ संपत्तीची विक्री करून आलेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी, त्या वर्षात आणि त्याच्या पुढील वर्षातील ठरावीक रोख्यांमधील गुंतवणूक ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नको.
ही रोखे गुंतवणूक पाच वर्षांसाठी आहे. या पाच वर्षांच्या काळात ही गुंतवणूक रोख रकमेत परावर्तित केल्यास, ज्या वर्षी ती रोख रकमेत परावर्तित केली त्या वर्षीचा भांडवली नफा म्हणून तो करपात्र होईल. हे रोखे तारण ठेऊन कर्ज किंवा आगाऊ रक्कम घेतल्यास कलम ‘५४ ईसी’मध्ये घेतलेली वजावट रद्द होते. या रोख्यांवर दरवर्षी ५ टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज करपात्र आहे. या कलमांतर्गत रुरल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, इंडिअन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थांनी रोखे आणले आहेत.
कलम ‘५४ ईसी’नुसार सवलत घेताना या रोख्यांचा कालावधी, त्यावर मिळणारे करपात्र व्याज, महागाई निर्देशांक, करदात्याचे वय यांचा विचार करून रोख्यांमध्ये गुंतवणूक करावी. रोख्यांच्या गुंतवणुकीवर मर्यादा असल्याने करदात्याचा भांडवली नफा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास पूर्ण सवलत घेता येत नाही.
२. कलम ‘५४ एफ’ : हे कलम देखील कलम ५४ सारखे नवीन घरात गुंतवणूक करून वजावट घेण्याचे आहे. मात्र कलम ५४ मध्ये फक्त निवासी घर आणि त्याला संलग्न जमीन यांची विक्री केल्यावर होणाऱ्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर, नवीन घरात केलेल्या गुंतवणुकीची वजावट मिळते आणि कलम ‘५४ एफ’नुसार कोणत्याही संपत्तीची (निवासी घर सोडून) मूळ संपत्ती विक्री केल्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर सवलतीची ही तरतूद आहे, असा दोन्ही कलमांमधील फरक आहे. साधारणतः या दोन्ही कलमांमध्ये नवीन घरात गुंतवणूक केल्यास वजावट मिळते. नवीन घर घेण्यासाठी सोने, समभाग, म्युच्युअल फंड, जमीन, प्लॉट, दुकान विकून पैसा जमा केला जातो. पागडी तत्त्वावरील असणारे घर किंवा दुकान विकून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी या कलमानुसार गुंतवणूक करता येते. या सर्व संपत्तीच्या विक्रीवरील भांडवली नफा हा करपात्र आहे. कर भरल्यामुळे रोकड सुलभता कमी होते, त्यामुळे नवीन घर घेण्यासाठी कर सवलत प्राप्तिकर कायद्यात आहे. या कलमानुसार नवीन घर घेण्यासाठीचा कालावधी देखील कलम ५४ प्रमाणेच आहे. ही गुंतवणूक मूळ संपत्ती विक्री केल्या तारखेपूर्वी एका वर्षाच्या आत किंवा विक्री केल्या तारखेपासून २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) करणे बंधनकारक आहे. या कलमानुसार मूळ संपत्तीची संपूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) म्हणजेच निव्वळ विक्री किंमत नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. निव्वळ विक्री रकमेपेक्षा कमी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास नवीन घराचे मूल्य आणि विक्री किंमत याच्या प्रमाणात वजावट मिळते. कलम ५४ नुसार एक घर विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक करताना फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास कर भरावा लागत नाही आणि कलम ‘५४ एफ’नुसार निव्वळ विक्री किंमत नवीन घरात गुंतवावी लागते. या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते, हा कलम ५४ आणि कलम ‘५४ एफ’मध्ये फरक आहे.
या सवलतीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून काही अतिरिक्त अटी या कलमामध्ये आहेत, ज्या कलम ५४ मध्ये नाहीत. करदात्याला या कलमानुसार वजावट मिळत नाही जर :
१. करदात्याकडे मूळ संपत्ती विकण्याच्या तारखेला एकापेक्षा जास्त (नवीन घर सोडून) घरे असतील तर, किंवा
२. करदात्याने मूळ संपत्तीच्या विक्रीनंतर एका वर्षात कोणतेही घर खरेदी (नवीन घराव्यतिरिक्त) केले तर, किंवा
३. करदात्याने मूळ संपत्तीच्या विक्रीनंतर तीन वर्षात कोणतेही घर बांधले (नवीन घराव्यतिरिक्त) तर.
करदात्याने ‘५४ एफ’ या कलमानुसार वजावट घेतल्यानंतर पुढील दोन वर्षात अजून एक घर खरेदी केले किंवा तीन वर्षात अजून एक घर बांधले तर करदात्याने पूर्वी घेतलेली वजावट रद्द होते. तसेच या कलमानुसार देखील नवीन घर (ज्या घराच्या गुंतवणुकीवर वजावट घेतली होती) खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी घेतलेली वजावट रद्द होते. करदात्याने आर्थिक नियोजन करताना या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. असे न केल्यास पूर्वी घेतलेली वजावट रद्द होऊ शकते आणि जास्त कर भरावा लागू शकतो.
ज्या आर्थिक वर्षात मूळ संपत्ती विकली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास, निव्वळ विक्री रक्कम भांडवली नफ्याअंतर्गत (कॅपिटल गेन) बँकेत जमा करावी लागते. ही रक्कम मुदतीत या खात्यात जमा केली नाही तर वजावट मिळत नाही. निव्वळ विक्री रक्कम पुढील दोन वर्षात (खरेदी केल्यास) किंवा तीन वर्षात (बांधल्यास) नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी न वापरल्यास तीन वर्षानंतर भांडवली नफ्याची रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. भांडवली नफ्याअंतर्गत उघडलेल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र मिळवून ते बँकेला सादर करावे लागते.
Pravindeshpande1966@gmail.com