आशीष ठाकूर
दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत धावपटूंनी इच्छित लक्ष्य विक्रमी वेळेत साध्य केल्यानंतर जो थकवा येतो त्याचप्रमाणे, निफ्टीने १७,६०० ते १८,४४२ असे ८४२ अंशांचे अंतर, मंदीच्या संध्याछायेत अवघ्या १६ दिवसांत कापल्याने जो थकवा आला आहे त्याला ‘जरा विसावू या या वळणावर!’ असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स: ६१,६६३.४८ / निफ्टी: १८,३०७.६५
निफ्टी निर्देशांकाला १७,६००च्या स्तरावर सकारात्मक वरचा छेद (अप ब्रेक-आऊट) आल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचेे लक्ष्य हे १७,९००…, १८,२००… पुढे १८,५०० असे तीनशे अंशांच्या परिघातील (बॅण्डमधील) असेल, जे आता साध्य होताना दिसत आहे. अवघ्या १६ दिवसांत उपरोक्त लक्ष्य अतिजलद गतीने साध्य झाल्याने आता थोड्या विश्रांतीची गरज आहे. निफ्टी निर्देशांकावर आता चालू असलेल्या विश्रांतीचे स्वरूप आज आपण जाणून घेऊ या.
अल्प मुदतीची विश्रांती : येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, या घसरणीचे स्वरूप हे हलकेफुलके असेल कारण निफ्टी निर्देशांकावर १६,७४७ वरून १८,४४२ अशी १,६९५ अंशांच्या वाढीसमोर अवघी ४४० अंशांची घसरण ही हलकीफुलकी असेल. निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,६०० ते १८,९०० असेल.
दीर्घ मुदतीची विश्रांती: निफ्टी निर्देशांक १८,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक १७,८०० ते १७,६०० पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यात मंदीचा कालावधी वाढून, ती दीर्घ मुदतीची विश्रांती ठरू शकते. या स्तरावर पायाभरणी करून निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,९०० असे असेल.
शिंपल्यातील मोती
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड
शुक्रवारचा (१८ नोव्हेंबर) बंद भाव : ७२.२० (-१.५०%)
४१ देशांत कार्यरत असलेली, वाहन उद्योगातील वलयांकित अशा मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्शे, सुझुकी, टाटा मोटर्ससारख्या उद्योगांच्या वाहनांसाठी विद्युत तारांची मांडणी (इलेक्ट्रिकल वायरिंग) बंपर, आरसे, डॅश बोर्ड अशा विविध पूरक वस्तू ज्याशिवाय चारचाकी पूर्णत्वास येऊ शकत नाही अशा उत्पादनांत माहीर असलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आताच्या घडीला वाहन उद्योग हा जरा ‘खाचखळग्यातील रस्त्यावरून’ वाटचाल करत असल्याने, हे धक्के (शॉक ॲब्सॉर्बर वापरत) सामावून घेत, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडने आपला मार्ग निर्धोक असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालावरून कंपनीने दाखवून दिले. जून आणि सप्टेंबरच्या वित्तीय तिमाहींचा तुलनात्मक विचार करता कंपनीचे जूनमधील उत्पन्न हे १,६१८.२३ कोटींवरून १,८१०.७४ कोटींवर गेले. तर करपूर्व नफा १४५.१८ कोटींवरून २७३.३२ कोटींवर गेले तर निव्वळ नफा १२० कोटींवरून २१३.९१ कोटींवर झेपावला.
आता ही दमदार आर्थिक कामगिरी समभागाच्या किमतीच्या वाटचालीवरून आपण त्या समभागाच्या अंतरंगात डोकावता, समभागावर तेजीवाल्यांचे की मंदीवाल्यांचे प्राबल्य आहे हे खालील स्तरांवरून समजण्यास मदत होईल.६५ ते ८५ रुपयांच्या दरम्यानची वाटचाल : ‘द्रुत महामार्गावर सलग सुट्या आल्यावर जसे बंपर टू बंपर ट्रॅफिक (रहदारी) असते तसे समभागाची ६५ ते ८५ रुपयांच्या दरम्यानची वाटचाल ही अडथळ्यांच्या मार्गावरील वाटचाल असेल. पण दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी समभाग खरेदीसाठीचा हा सुवर्णकाळ असेल. बाजारात आणि या समभागात जेव्हा मंदी येईल तेव्हा हा समभाग ६५ ते ७० रुपयांच्या दरम्यान गुंतवणूकयोग्य ठरू शकेल. मात्र रक्कम एकदम न गुंतवता, हा समभाग वीस टक्क्यांच्या पाच तुकड्यांत दीर्घ मुदतीकरिता खरेदी करावा.
८५ रुपयांच्या स्तरावरील वाटचाल : भविष्यात समभागाची किंमत ८५ रुपयांच्या स्तरावर पाच दिवस टिकल्यास, तसेच या स्तरावर उलाढालीचा (व्हॉल्यूम) भरभक्कम आधार लाभल्यास, या समभागासाठी ही द्रुत महामार्गावरील अतिजलद वाटचाल असून ९५ ते १०० रुपयांचे अल्प मुदतीचे वरचे लक्ष्य, तर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी १२० ते १४० रुपयांचे वरचे लक्ष्य असेल. या गुंतवणुकीला ६० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
(महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.)
निकालपूर्व विश्लेषण
१) पीटीसी इंडिया लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २२ नोव्हेंबर
१८ नोव्हेंबरचा बंद भाव – ८०.६५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ८३ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ८३ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९५ रुपये, द्वितीय लक्ष्य ११० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ८३ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७० रुपयांपर्यंत घसरण.
२) सीमेन्स लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २२ नोव्हेंबर
१८ नोव्हेंबरचा बंद भाव- २,८३७.७० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३,००० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,१५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,३५० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ३,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,५५० रुपयांपर्यंत घसरण.
आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
(अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)