Highest rate of interest on fixed deposits: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये बदल करण्यात आले. रिझर्व्ह बँकने FD (Fixed deposit) वरील व्याजदर काही टक्क्यांनी वाढवण्याचे आदेश देशातील बॅंकांना दिले आहेत. या निर्णयामुळे बॅंकांवर मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण झाला होता. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयने घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम हळूहळू पाहायला मिळत आहेत. नव्या नियमानुसार प्रत्येक बॅंकेने त्यांच्याकडे असलेल्या मुदत ठेवींच्या सेवेवरील व्याजदर वाढवले आहेत.
गुंतवणूकदारांना, सामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रिझर्व्ह बँकने घेतलेल्या निर्णयाचा लाभ होणार आहे. पण कोणत्या बॅंकेमध्ये मुदत ठेव करणे अधिक फायद्याचे ठरु शकते हे ओळखून मग त्यात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे. यासाठी आम्ही देशातील काही बॅंकांच्या मुदत ठेवींवरील बदलेल्या व्याजदराबाबतची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्यतिरिक्त आणखी माहिती तुम्ही त्या-त्या बॅंकेच्या वेबसाइटवरुन मिळवू शकता.
PNB बॅंक –
पंजाब नॅशनल बॅंक (Punjab national bank) या बॅंकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केल्यानंतर लोकांना अधिक परतावा देण्याची घोषणा केली. २७१ दिवसांपासून ते एका वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी मुदत ठेवींवर ५.८० टक्के व्याजदर मिळणार आहे. पूर्वी हा दर ५.५० टक्के होता. जेष्ठ नागरिकांना मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना ६.३० टक्के व्याजदर मिळणार असून आधी हा दर ६ टक्के इतका होता. सुपर सीनिअर लोकांसाठीचा व्याजदर ६.३० टक्क्यांवरुन ६.६० टक्के करण्यात आला आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केल्यास या दरवाढीचा फायदा घेता येणार आहे. एका वर्षापेक्षा जास्तीच्या ठेवींवर ५.८० टक्के व्याज मिळणार आहे. आधी ही टक्केवारी ५.७५ टक्के इतकी होती. वरिष्ठ नागरिकांसाठी पूर्वी व्याजदर ७.२५ होता तो वाढवून ७.३० टक्के इतका करण्यात आला आहे. तर त्यापेक्षाही वरिष्ठांनी केलेल्या गुंतवणूकीवर त्यांना ७.५५ टक्के व्याज मिळणार आहे. हे पूर्वी ७.६० टक्के होते. अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
SBI बॅंक –
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State bank of India) ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकांपैकी एक आहे. एसबीआयने विविध कालावधीसाठी मुदत ठेवींच्या योजना सुरु केल्या आहेत. या बॅंकेने १, २, ३ आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी पैसे मुदत ठेव म्हणून गुंतवल्यास दिल्या जाणाऱ्या व्याजावर ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी FD वरील व्याजदरामध्ये बॅंकेने वाढ केली. एका वर्षासाठीच्या मुदत ठेवींवर पूर्वी ६.७५ टक्के व्याज मिळायचे. आता ते ६.८० टक्के झाले आहे. दोन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास त्यावर ६.७५ टक्के व्याजदराने पैसे दिले जाणार आहेत. ३ आणि ५ वर्षांसाठी मुदत ठेव केल्यास त्यावर ६.५० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
HDFC बॅंक –
Housing Development Finance Corporation Limited हे HDFC बॅंकेचे सविस्तर रुप आहे. या बॅंकेच्या मुदत ठेवींमध्ये २ कोटी रुपयांपेक्षा कमी पैसे गुंतवल्यास वार्षिक ७.१० टक्के व्याज मिळणार आहे. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत मुदत ठेव करण्यासाठीची सोय या बॅंकेमध्ये उपलब्ध आहे. या बॅंकेद्वारे ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ७ टक्के व्याज दिले जाणार आहे. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी HDFC बॅंकेने व्याजदरामध्ये वाढ करण्याबाबत निर्णय घेतले. अधिक माहितीसाठी HDFC बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
आणखी वाचा: FD की SCSS; कशात कराल गुंतवणूक? ज्येष्ठ नागरिकांनी सविस्तर माहिती वाचून मगच घ्यावा निर्णय
ICICI बॅंक –
Industrial Credit and Investment Corporation of India म्हणजेच ICICI बॅंकेने ग्राहकांना खुश करण्यासाठी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारी रोजी यासंबंधित निर्णय घेण्यात आले. या ठेवींवर सामान्य नागरिकांना ६.९ टक्के तर जेष्ठ नागरिकांना ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, दोन कोटींपेक्षा कमी पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवताना –
१. पंधरा महिन्यांपासून ते अठरा महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास सामान्य ग्राहकांना ७.१० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदराने पैसे मिळतील.
२. दोन वर्षांपर्यंत मुदत ठेव केल्यास सामान्य ग्राहकांना ७ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याजदराने पैसे मिळतील.
३. एका वर्षांपासून ते ३८९ दिवसांपर्यंतच्या काळात गुंतवणूक केल्यास सामान्य ग्राहकांना ६.७० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के व्याजदराने पैसे मिळतील.
४. अठरा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत पैसे मुदत ठेव म्हणून गुंतवल्यास सामान्य ग्राहकांना ७.१० तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदराने पैसे मिळतील.
अधिक माहितीसाठी ICICI बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.