विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजस्थानमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीना यांनी खळबळजनक दावा केला आहे. मीना यांनी सांगितले की, जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा आणि ५० किलो सोने ठेवले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत लॉकर उघडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मीना यांनी कोणते दावे केले?
किरोडी लाल मीना यांनी सुरुवातीला ते कोणाचे लॉकर्स आहेत हे सांगण्यास नकार दिला, परंतु नंतर सांगितले की, ५० लॉकर्स कार्यरत आहेत आणि त्यापैकी १० काही अधिकार्यांचे आहेत. या लॉकर्समध्ये पेपर लीक, आयटी (माहिती तंत्रज्ञान) घोटाळा, जल जीवन मिशन (जेजेएम) घोटाळ्यातून बनवलेला काळा पैसा असल्याचा आरोप मीना यांनी केला आहे.
खळबळजनक दावा केल्यानंतर किरोडी लाल मीना यांनी जयपूर येथील गणपती प्लाझा येथील एका खासगी कंपनीचे कार्यालयही गाठले. लॉकर्स येथेच असल्याचा दावा त्यांनी केला. पोलीस, प्राप्तिकर विभाग आणि इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून लॉकर उघडण्याची मागणी सुरू केली. काही वेळाने पोलीस तेथे पोहोचले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मीना म्हणाले की, पोलिसांनी लॉकर्स असलेल्या परिसराचे मुख्य गेट सील केले आहे. प्राप्तिकर विभागाचे एक पथकही तेथे पोहोचले होते आणि नंतर अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथकही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेथे पोहोचले, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचाः पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्र्यांनी आता का केले ‘हे’ विधान?
काँग्रेसवर हल्लाबोल केला
भाजप नेते किरोडी लाल मीना यांनी यापूर्वीही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पेपर फुटी प्रकरणात बाबुलाल कटारा यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात काँग्रेस नेते दिनेश खोडानिया आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या नेत्या स्पर्धा चौधरी यांचा हात असल्याचा आरोप केला होता. कटारा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, पेपर लीकप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची चौकशी केली आहे. मीना (किरोडी लाल मीना) म्हणाले की, पेपर लीक प्रकरणामागे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे दिनेश खोडनिया होते आणि त्यांनीच कटारा यांची राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. ते म्हणाले की, पूर्वी काँग्रेसशी संबंधित असलेल्या स्पर्धा चौधरी याही कटारा यांच्याशी संबंधित होत्या.
विधानसभा निवडणुका कधी?
राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी २३ नोव्हेंबरला निवडणुका जाहीर केल्या होत्या, मात्र आता तारीख बदलण्यात आली आहे. देव उठनी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे आणि तो दिवस राजस्थानमध्ये लग्न समारंभांसाठी एक मोठा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर राजस्थानमध्ये हजारो विवाह होतात. हे लक्षात घेऊन तारीख बदलण्यात आली.