बंगळुरू : विद्युत शक्तीवर चालणाऱ्या दुचाकींची निर्मिती करणारी ‘एथर एनर्जी’ने येत्या वर्षभरात क्षमता विस्ताराचा भाग म्हणून नवीन प्रकल्प उभारण्यासाठी १,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे. या गुंतवणुकीसाठी कंपनीने महाराष्ट्राची निवड केली असून, राज्य सरकारसोबत या संबंधाने चर्चा सुरू आहे, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
एथर एनर्जी ही विद्युत शक्तीवर चालणाऱ्या दुचाकींची निर्मिती करणारी देशातील आघाडीच्या वाहन निर्मात्यांपैकी एक आहे. सध्या देशात विकल्या जाणाऱ्या विद्युत दुचाकींमध्ये तिचा ७५ टक्के बाजारहिस्सा असल्याचा एथर एनर्जीचा दावा आहे. शिवाय सध्या प्रत्येक पाच दुचाकींमागे एक विद्युत शक्तीवर चालणारी दुचाकी विकली जात असल्याने बाजारपेठेतही जलद गतीने विस्तार सुरू आहे. परिणामी कंपनीचा नजीकच्या काळाविषयी दृष्टिकोन आशावादी असून येत्या वर्षभरात क्षमता विस्तारासाठी नवीन प्रकल्प उभारण्याची तिने तयारी सुरू केली आहे. त्याबाबत महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये प्रकल्प उभारणीसाठी चाचपणी सुरू आहे, असे एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्याधिकारी तरुण मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हेही वाचा – ऑनलाइन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक
या नियोजित प्रकल्पासाठी जागेची निवड तसेच विस्तार नियोजनाबाबत अन्य कोणत्याही तपशिलाचा खुलासा तूर्त करता येणार नाही, अशी पुस्तीही मेहता यांनी जोडली. कंपनीने नुकतीच ४५० एस आणि नूतनीकृत ४५० एक्स या विद्युत शक्तीवर चालणाऱ्या नवीन दुचाकी सादर केल्या आहेत. आता कंपनीने ४५० मंचावरील वेगवेगळ्या मूल्य श्रेणींमधील तीन उत्पादनांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. नव्या ‘४५० एस’मध्ये दिवसाच्या लख्ख प्रकाशातदेखील स्पष्ट दिसणाऱ्या डिस्प्ले सुविधेसह इनबॉक्स-इन-स्कूटर या वैशिष्ट्य इतर ॲप्सवरचे (जसे की व्हॉट्सॲप/टेलिग्राम/इन्स्टाग्राम) संदेश बघता येणार आहे. शिवाय गंतव्यस्थळाचे पत्ते थेट एथर डॅशबोर्डवर दिसणार असल्याने निश्चितस्थळी दिशादर्शनासह सहजरीत्या पोहोचण्यास मदत होणार आहे.
देशातील ‘ईव्ही’ परिसंस्था जलदरीत्या विस्तारत असून त्याबाबत आम्ही आशावादी आहोत. या परिसंस्थेचा एक भाग म्हणून सध्या महाराष्ट्रासह, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारसोबत नवीन प्रकल्प उभारणीबाबत चर्चा सुरू आहे. तसेच कंपनी येत्या एक ते दोन वर्षांत प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून निधी उभारण्याचीही योजना आखत आहे. – तरुण मेहता, सह-संस्थापक आणि मुख्याधिकारी, एथर एनर्जी