जगभरात लोकप्रिय असलेल्या परंतु भारतात गुंतवणूकदारांनी पाठ फिरवलेल्या सोने गुंतवणुकीतील सुरक्षित मानला जाणारा पर्याय ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)’मध्ये सरलेल्या मे महिन्यात १०३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नक्त ओघ दिसून आला, अशी माहिती म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’ने मंगळवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल महिन्यात १२४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र त्याआधी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये गोल्ड ईटीएफमधून २६६ कोटींचा निधी काढून घेतला होता. शिवाय सरलेल्या मे महिन्यात नफावसुलीमुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत गुंतवणूक घटली आहे. जागतिक अर्थ अनिश्चिततेपोटी सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांनी शाश्वत मूल्य असलेल्या सोन्याकडे पैसा वळविला आहे, त्याचा प्रत्यय सरलेल्या महिन्यात आला. सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि कमजोर रुपया यामुळे हा गुंतवणुकीचा पर्याय सध्या आकर्षक बनल्याचाही हा परिणाम आहे.

विद्यमान वर्षातील एप्रिल अखेरीस गोल्ड ईटीएफमधील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता २२,९५० कोटींवरून मे अखेरीस २३,१२३ कोटींवर पोहोचली आहे. सोन्याने गेल्या काही वर्षांतील उत्कृष्ट कामगिरी बजावत जागतिक प्रतिकूलतेपायी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. फोलिओमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ ते त्याचेच प्रतिबिंब आहे. एप्रिलमधील ४७.१३ लाखांवरून गोल्ड ईटीएफ फोलिओ १५,००० वाढून ४७.२८ लाख झाले आहेत. यावरून गुंतवणूकदारांचा सोन्याशी संबंधित फंडांकडे अधिक कल असल्याचे निदर्शनास येते.

हेही वाचाः ऑफिसला यायला सांगितल्यामुळे टीसीएसमधल्या महिला सामूहिक राजीनामा देतायत? कंपनीनं दिलं उत्तर

ओघ ७४ टक्क्यांनी घटला

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, गोल्ड ईटीएफमध्ये ६५३ कोटी रुपयांचा ओघ आला, जो त्याआधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये दिसलेल्या २,५४१ कोटी रुपयांच्या तुलनेत ७४ टक्क्यांनी घटला आहे. ही घसरण प्रामुख्याने या मालमत्ता वर्गातील नफावसुलीमुळे आणि गुंतवणूकदारांच्या समभाग आणि त्या संलग्न गुंतवणूक साधनांना पसंती दिल्यामुळे झाली. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात गुंतवणूकदार फोलिओ आणि एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ झाली आहे.

हेही वाचाः ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करता येणार; UPI123PAY सेवा लाँच

काय असतो गोल्ड ईटीएफ?

सोन्यात गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ एक सुरक्षित पर्याय समजला जातो. गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडच असतो. गोल्ड ईटीएफमध्येही सोन्याचा दर वरखाली होत असतो. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची आशा असते. गोल्ड ईटीएफ हा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे सोन्याच्या शुद्धतेची यात कोणतीही काळजी करण्याचं कारण नसतं. फिजिकल गोल्डच्या तुलनेत गोल्ड ईटीएफ लवकर आणि बाजारातील सध्याचा दर पाहून विकले जाऊ शकते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 103 crores in gold etf considered a safe option for investment vrd