मुंबई : जागतिक पातळीवरील अस्थिर संकेतांनंतरही, निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मंगळवारी मोठय़ा घसरणीतून बाजार सावरू शकला. बाजारात मंगळवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७०० अंशांहून अधिक घसरण झाली होती. मात्र अखेरच्या तासात झालेल्या चौफेर खरेदीने ही घसरण १०३ अंशांपर्यंत सीमित राहिली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०३.९० अंशांनी (०.१७ टक्के) घसरून ६१,७०२.२९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात तो ७०३.५१ अंशांनी घसरून ६१,१०२.६८ या सत्रातील नीचांकापर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३५.१५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,३८५.३० पातळीवर स्थिरावला.
आंतराष्ट्रीय पातळीवर जपानची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘बँक ऑफ जपान’ने १० वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांवरील कमाल परतावा मर्यादा अर्ध्या टक्क्यांवर नेली आहे. कठोर धोरणाला सूचित करणारे हे तिचे हे अनपेक्षित पाऊल जागतिक बाजारासाठी धक्कादायक ठरले. त्यामुळे आधीच फेडच्या व्याज दरवाढ आणि मंदीच्या इशाऱ्याने दक्ष झालेल्या जागतिक बाजारांवरील घसरण छाया अधिकच गडद झाली. लवकरच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या विकसदाराची आकडेवारी प्रसिद्ध होणार आहे, त्यावरून जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचे चित्र स्पष्ट होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, हिंदूस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत राहिले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारच्या सत्रात ५३८.१० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.