Mumbai Diamond Market Shifted In Surat : सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे ३४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. सूरत डायमंड बोर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा खिताबसुद्धा बहाल करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अमेरिकेतील पेंटागॉन इमारतीकडे होता. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे, कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. काल (१७ डिसेंबर) या सूरत डायमंड बोर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटने झाले.
वर्षानुवर्षे सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सूरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिऱ्यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले. ज्याद्वारे सूरतमध्ये तयार केलेले हिरे मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जात होते.
परंतु आता असे होणार नाही, कारण सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सूरत येथे बांधण्यात आली आहे, ज्यामध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सूरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सूरतला स्थलांतरित होत आहेत. सूरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सूरत डायमंड बोर्सचे समिती सदस्य दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या ड्रीम सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत खजोद परिसरात प्रत्येकी १४ मजल्यांचे ९ टॉवर्स बनवण्यात आले असून, ते ६७ लाख चौरस फूट जागेवर बांधण्यात आले आहेत. या टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची ४३०० कार्यालये आहेत. इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. हा सूरत डायमंड बोर्स अंदाजे ३४०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. सूरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे, यासाठी हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन सरकारकडून येथे जमिनी खरेदी केल्या होत्या.
उद्योगपती मुंबई सोडून सूरतला स्थलांतरित होतायत
दिनेश भाई म्हणाले की, आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सूरतच्या व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते, कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. पण आता सूरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाऊस तयार आहे. आता सूरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार असून, त्यामुळे सूरतचे हिरे व्यापारी आता मुंबईऐवजी सूरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकतील.
दिनेश भाई यांनी सांगितले की, सूरत डायमंड बोर्स सुरू झाल्यामुळे सूरतच्या रिअल इस्टेटलाही मोठा फायदा झाला आहे, कारण मुंबईतून स्थलांतरित होणाऱ्या लोकांना नवीन घराची गरज आहे, त्यामुळे व्यापारी लोक घरे खरेदी करीत आहेत. याशिवाय शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. शॉपिंग मॉल्समध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सूरत डायमंड बुर्सच्या उद्घाटनाचा फायदा सूरतच्या प्रत्येक भागातील लोकांना होणार आहे. याशिवाय जवळपास १ लाख लोकांना एकाच छताखाली रोजगारही मिळणार आहे. दिनेश भाईंनी सांगितले की, सूरत डायमंड बाजार उघडल्यानंतर मुंबईतील हिरे व्यवसायाशी संबंधित सुमारे १००० कार्यालये कायमची बंद होतील. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र सरकारचेही कोट्यवधी रुपयांचे कराचे नुकसान होणार आहे.
आता कॉर्पोरेट ऑफिस सुरतमध्येच राहणार
सुरतचे मोठे हिरे व्यापारी असलेले वल्लभभाई लखानी यांनी आपला व्यवसाय पूर्णपणे मुंबईतून स्थलांतरित केला आहे, ते किरण डायमंड एक्सपोर्ट या नावाने देशात आणि जगात हिऱ्यांचा व्यवसाय करतात. वल्लभभाई लखानी यांनी आपले हिरे जगातील देशांना पाठवण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत कार्यालय उघडले होते. त्यांच्या कार्यालयात सुमारे २५०० कर्मचाऱ्यांचा ताफा असायचा. सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना परदेशात हिरे पाठवण्यासाठी मुंबईशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
किरण (जेम्स) निर्यात संचालक वल्लभ लखानी यांनी सांगितले की, ते मूळचे भावनगरचे आहेत. १९८० मध्ये व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले आणि तिथे हिऱ्यांची कंपनी सुरू केली. भारत डायमंड बोर्सचे मुख्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे होते. त्यांनी १९९७ मध्ये सूरतमध्ये व्यवसाय सुरू केला. किरण जेम्सची वार्षिक उलाढाल सुमारे १७ हजार कोटी रुपये आहे, तर आणखी एक ज्वेलरी कंपनी आहे, ज्याची उलाढाल सुमारे ३ हजार कोटी रुपये आहे. एकूणच त्यांच्या कंपन्यांची उलाढाल ३ हजार कोटी रुपयांची आहे.
घाईघाईने सुरतला परततायत व्यापारी
वल्लभभाई लखानी यांनी सांगितले की, त्यांनी आपला व्यवसाय मुंबईतून पूर्णपणे बंद केला आहे आणि तो सूरतला हलवला आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी त्यांनी सध्या विविध इमारतींमध्ये १२०० फ्लॅट बांधले आहेत. सूरत डायमंड बोर्सचे औपचारिक उद्घाटन होताच कंपनीने बांधलेल्या घरांमध्ये कर्मचारी राहू लागतील. कर्मचार्यांसाठी बांधलेल्या घरांमध्ये सर्व घरगुती वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई कार्यालयात फक्त १०० कर्मचारी गुजराती आहेत, बाकीचे कर्मचारी महाराष्ट्र आणि इतर राज्यातील आहेत, त्यापैकी बहुतेकांनी सूरतला येण्याचे मान्य केले आहे.