मुंबई: वाहन निर्मात्या टाटा मोटर्सचा निव्वळ नफा ३१ मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत तिप्पट वाढीसह १७,५२८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ५,४९६.०४ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. जग्वार लँड रोव्हरसह कंपनीच्या तिन्ही वाहन श्रेणीतील व्यवसायांनी चांगली कामगिरी केल्याने नफ्यात अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली.
कंपनीचा एकत्रित महसूल १,१९,९८६ कोटींवर पोहोचला असून तो गेल्या वर्षी १,०५,९३२ कोटी होता. जग्वार लँड रोव्हरने सरलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत १.४ अब्ज पौंडांचा विक्रमी नफा नोंदवला आहे. संपूर्ण २०२३-२४ आर्थिक वर्षात कंपनीने ३१,८०६.७५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळवला आहे. जो मागील आर्थिक वर्षात केवळ २,६८९.८७ कोटी रुपये होता. तर तिचा एकूण एकत्रित महसूल ४,३७,९२७ कोटी रुपये आहे, जो आधीच्या आर्थिक वर्षात ३,४५,९६६ कोटी होता.
हेही वाचा >>>देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेचा तिमाही नफा २१,३८४ कोटींवर; भागधारकांना प्रति समभाग १३.७० रुपयांचा लाभांश घोषित
कंपनीच्या संचालक मंडळाने ३ रुपयांचा अंतिम, तर ३ रुपये विशेष असा एकूण ६ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा समभाग १.५९ टक्क्यांनी वधारून १,०४६.६५ रुपयांवर बंद झाला.
देशातील व्यवसाय कर्जमुक्त
कंपनीचा भारतातील व्यवसाय आता कर्जमुक्त झाला आहे आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकंदर जगभरातील व्यवसाय कर्जमुक्त करण्याचा तिचा मानस आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये टाटा मोटर्स समूहाने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल, नफा मिळवला आहे, असे टाटा मोटर्स समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी, पीबी बालाजी म्हणाले. आगामी वर्षात अशीच मजबूत कामगिरी कायम राखण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.