वृत्तसंस्था, नवी दिल्ली
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कंपनी ॲक्सेंच्युअर मंदीच्या सावटामुळे मोठी कर्मचारी कपात करण्याची योजना आखात आहे. जगभरातून एकूण मनुष्यबळाच्या अडीच टक्के म्हणजेच १९ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कमी केले जाण्याची शक्यता आहे.
ॲक्सेंच्युअरने दिलेल्या माहितीनुसार, पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत टप्याटप्याने १९ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याच्या योजनेबाबत विचार सुरू आहे. यात कंपनीच्या मुख्य कामाशी निगडित नसलेल्या विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. कंपनीकडून वाढीचा प्राधान्यक्रम असलेल्या विभागातील कर्मचारी भरती आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू राहणार आहे.
कंपनीने फेब्रुवारीअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीला १५.३ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे. कंपनीच्या महसुलात (डॉलरच्या रूपात) मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा >>>Gold Rate Today: दोन दिवसांत सोने ९५० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव
महसुली उद्दिष्टाला कात्री
ॲक्सेंच्युअरने वार्षिक महसूल-प्राप्तिचे उद्दिष्ट्ही कमी केले असून, नफ्याचा अंदाजही घटवला आहे. मंदीच्या सावटांमुळे अनेक कंपन्यांकडून तंत्रज्ञानविषयक खर्चात कपात केली जाणार आहे. यामुळे माहिती-तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या ॲक्सेंच्युअरसह इतर कंपन्यांच्या वार्षिक महसुली वाढीवर परिणाम होणार आहे. कंपनीने ८ ते ११ टक्के दराने महसुली वाढीचे उद्दिष्ट आधी ठेवले होते, ते आता ८ ते १० टक्के असे कमी करण्यात आले आहे.