लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या फेब्रुवारीमध्ये त्यायोगे विक्रमी १९,१८६ कोटींची गुंतवणूक आली. ‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, फेब्रुवारीअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही ८.२० कोटी अशी विक्रमी स्तर गाठणारी आहे. जानेवारी २०२४ मध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून मासिक गुंतवणुकीने १८,८३८ कोटी रुपयांची नोंद केली होती.
सरलेल्या महिन्यात ४९.७९ लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांची भर पडली आहे. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि विक्रमी योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढती विश्वासार्हता निदर्शनास येते. इक्विटी म्हणजेच समभागसंलग्न म्युच्युअल फंडांनी फेब्रुवारीमध्ये २६,८६६ कोटींचा ओघ नोंदवला, जो २३ महिन्यांतील सर्वाधिक मासिक ओघ राहिला आहे. या वर्षीच्या जानेवारीतील २१,७८० कोटींपेक्षा तो २३ टक्क्यांनी अधिक आहे.
‘ॲम्फी’ने मासिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, सलग ३६व्या महिन्यात समभागसंलग्न फंडांमध्ये सकारात्मक प्रवाह राहिला. समभागसंलग्न श्रेणीमध्ये आठ नवीन फंड खुले झाल्याने त्यातून एकत्रितपणे ८,६९२ कोटी रुपयांचा ओघ आला. सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंड श्रेणीमध्ये सर्वाधिक ११,२६३ कोटींचा ओघ होता. यानंतर लार्ज कॅप श्रेणीमध्ये ३,१५७ कोटी, स्मॉल कॅप २,९२२ कोटी आणि मिड कॅप १,८०८ कोटी रुपयांची गुंतवणूक आली.
भारतीय गुंतवणूकदारांनी देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि बाजारांवर विश्वास दाखविल्याचे आश्वासक चित्रही पुढे आले आहे. ‘ॲम्फी’ने मासिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण गंगाजळी (एयूएम) ५४.५४ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.