पीटीआय, नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नवीन १९.९४ लाख सदस्य सरलेल्या जुलै महिन्यात नव्याने दाखल करून घेतल्याचे नुकतेच स्पष्ट केले. संघटित क्षेत्रातील रोजगारातील वाढीसंबंधी डळमळलेले वातावरण बदलत असल्याचे आश्वासक चित्र ही वाढ दर्शविते.

‘ईपीएफओ’ने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, १०.५२ लाख नवीन सदस्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांचे सदस्यत्व घेतले आहे. याआधीच्या महिन्याच्या म्हणजेच जून २०२४ च्या तुलनेत ही संख्या २.६६ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये १८ ते २५ वर्षे वयोगटातून जुलै महिन्यात ८.७७ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ५९.४ टक्के पहिल्यांदाच नोंदणी करणारे नवीन सदस्य आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतील आस्थापनांनी सर्वाधिक सदस्य जोडले आहेत.

हेही वाचा >>>‘…तर ७५ टक्के युजर UPI पेमेंट करणं बंद करतील’, ताज्या सर्व्हेमधून समोर आले निष्कर्ष!

लिंगनिहाय विश्लेषणानुसार, जुलैमध्ये नोंदणी झालेल्या नवीन सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या ४.४१ लाख आहे. ज्यात ३.०५ लाख नवीन महिला सदस्यांचा समावेश आहे. महिलांच्या रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असूनही देशांतर्गत आघाडीवर गेल्या काही महिन्यांपासून रोजगाराबाबत आशादायक चित्र दिसत असल्याची त्यांनी पुस्ती जोडली.