2000 Rupees Notes Deposit: तुम्हीसुद्धा आतापर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केलेल्या नसल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. लोक आता २ हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नोंदणीकृत पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात पाठवू शकता. रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांपासून दूर राहणाऱ्यांसाठी हा एक सोपा पर्याय आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे प्रादेशिक संचालक रोहित पी म्हणाले, “आम्ही ग्राहकांना सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित रीतीने त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी पोस्टाद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली असून, २ हजार रुपयांच्या नोटा पाठवण्यास मदत मिळणार आहे. यामुळे अनेकांचा त्रास वाचणार आहे.” टीएलआर आणि पोस्ट ऑफिस या पर्यायांबाबत लोकांच्या मनात कोणतीही भीती नसावी. एकट्या दिल्ली कार्यालयाला आतापर्यंत सुमारे ७०० TLR फॉर्म मिळाले आहेत. आरबीआय आपल्या कार्यालयातील एक्सचेंज सुविधेव्यतिरिक्त हे दोन पर्याय देते.
हेही वाचाः रतन टाटांची आवडती कंपनी ‘तोट्यात’; इथूनच करिअरला केली सुरुवात
RBI ने १९ मे रोजी २ हजारांच्या नोटा वितरणातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची आणि इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची सुविधा देण्यात आली. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोटा आता परत आल्या आहेत.
हेही वाचाः UPI युजर्सची संख्या वाढतीच, सलग तिसऱ्या महिन्यात १ हजार कोटींहून अधिक व्यवहार
७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती
या नोटा बदलून देण्याची किंवा बँक खात्यात जमा करण्याची अंतिम मुदत पूर्वी ३० सप्टेंबर होती. नंतर ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. यानंतर ७ ऑक्टोबर रोजी बँक शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करणे आणि बदलणे या दोन्ही सुविधा बंद करण्यात आल्या.
आरबीआयने माहिती दिली
लोक अजूनही त्यांच्या १९ प्रादेशिक कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पोस्टाद्वारे २ हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. यासाठी आरबीआयने फॉर्मेटही जारी केला आहे, अशी माहिती RBI ने एका प्रेस नोटद्वारे दिली आहे.
RBI इश्यू ऑफिसला पोस्टाद्वारे २ हजार रुपयांच्या नोटा कशा पाठवायच्या?
तुम्हाला येथे दिलेल्या फॉर्मच्या आधारे RBI शाखेत २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. येथे नमूद केलेल्या अर्जामध्ये सर्व आवश्यक तपशील योग्यरीत्या भरून तुम्ही ही नोट इंडिया पोस्टच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून पाठवू शकता.
फॉर्ममध्ये काय नियम दिले आहेत?
- तुम्ही ज्या खात्यात २ हजार रुपयांच्या नोटा पाठवत आहात, ते KYC सक्षम आहे की नाही हे फॉर्ममध्ये नमूद करावे लागेल.
- पाठवलेल्या नोटा बनावट असल्याचे आढळल्यास आरबीआयला पोलिसांना माहिती देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
- ज्या खात्यात नोटा पाठवल्या जात आहेत ते चुकीचे असल्याचे आढळल्यास त्याला आरबीआय जबाबदार राहणार नाही.
- जर नोटा फाटलेल्या, जळालेल्या किंवा खराब झालेल्या आढळल्या, तर RBI ला नियमांनुसार सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे.