गेल्या चार वर्षांत ५.२ कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. होय, एसबीआय रिसर्चने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. SBI च्या नवीन संशोधन अहवालात गेल्या चार वर्षातील EPFO पेरोल डेटाचे विश्लेषण केले गेले आहे. एसबीआय रिसर्चच्या अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत EPFO आणि NPS च्या आकडेवारीत देशात ५.२ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यापैकी ४७ टक्क्यांहून अधिक जण असे आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच नोकरी मिळवली आहे. देशातील विरोधक बेरोजगारीचा मुद्दा उचलत असताना ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी ही दिलासादायक बातमी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
विक्रमी संख्येने लोकांना नोकऱ्या मिळू शकतात
SBI संशोधन अहवालात असे समोर आले आहे की, आर्थिक वर्ष २०२० ते २०२३ दरम्यान निव्वळ नवीन EPF ग्राहकांची संख्या ४.८६ कोटी होती. रिसर्च रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत EPFO पेरोल डेटा खूपच उत्साहवर्धक आहे. पहिल्या तिमाहीत ४४ लाख नवीन EPF ग्राहकांची वाढ झाली आहे. त्यापैकी पहिले वेतन हे १९.२ लाख रुपयांचे होते. हा ट्रेंड संपूर्ण आर्थिक वर्षभर सुरू राहिल्यास आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निव्वळ नवीन वेतनपट १.६० कोटी रुपये (आतापर्यंतचा सर्वोच्च) ओलांडेल, प्रथम वेतन ७०-८० लाखांच्या श्रेणीत असेल. जे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च असणार आहे.
NPS डेटा काय सांगतो?
NPS डेटानुसार, २०२३ आर्थिक वर्षात ८.२४ लाख नवीन ग्राहक जोडले गेलेत. त्यापैकी ४.६४ लाख राज्य सरकारी पेन्शनधारक आहेत, त्यानंतर २.३० लाख अशासकीय आणि १.२९ केंद्र सरकार निवृत्ती वेतनधारक आहेत. गेल्या ४ वर्षात सुमारे ३१ लाख नवीन ग्राहक NPS मध्ये सामील झालेत. याचा अर्थ असा की, आर्थिक वर्ष २०२० ते २०२३ पर्यंत EPFO आणि NPS ने एकूण ५.२ कोटींपेक्षा जास्त पेरोल तयार केले आहेत.