पीटीआय, नवी दिल्ली
देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५ टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात ३ लाख ४१ हजार ५१० प्रवासी वाहनांची विक्री झाली. मागणी कमी झाल्याने कंपन्यांकडून वितरकांना वाहनांचा पुरवठा कमी झाल्याचे दिसून आले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) संस्थेने जुलैमधील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे.
यानुसार, जुलैमध्ये एकूण ३ लाख ४१ हजार ३५० प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही विक्री ३ लाख ५० हजार ३५५ होती. गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांमध्ये युटिलिटी वाहनांची विक्री सर्वाधिक १ लाख ८८ हजार २१७ आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ती १ लाख ८० हजार ८३१ होती. त्यात आता ४.१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रवासी मोटारींच्या विक्रीत १२ टक्के घट झाली असून, ही विक्री ९६ हजार ६५२ आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ही विक्री १ लाख ९ हजार ८५९ होती.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याचे दर कडाडले, पाहा मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत
प्रवासी वाहनांच्या मागणीत घट झाल्याने कंपन्यांकडून वितरकांना त्यांचा पुरवठा कमी झाला आहे. गेल्या दोन वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे आता मागणी कमी होऊ लागली आहे. याचबरोबर वाहन निर्मिती कंपन्यांकडून पुरवठा कमी करून वाहनांचा साठा कमी करण्यावर भर दिला जात आहे. सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि आगामी सणासुदीचा काळ यामुळे पुन्हा अल्प काळासाठी मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे सियामने नमूद केले आहे.
देशातील जुलैमधील वाहन विक्री
प्रवासी मोटारी – ९६ हजार ६५२
युटिलिटी मोटारी – १ लाख ८८ हजार २१७
दुचाकी – ८ लाख ५० हजार ८४९
स्कूटर – ५ लाख ५३ हजार ६४२
तीनचाकी – ५९ हजार ७३
दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत जुलै महिन्यात चांगली वाढ दिसून आली. प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत आणि ग्रामीण क्षेत्रावर भर देण्यात आल्याने मध्यम कालावधीसाठी वाहन निर्मिती क्षेत्राला फायदा होईल.- विनोद अगरवाल, अध्यक्ष, सियाम