असं म्हणतात की, एक चूक आयुष्यभराची कमाई, मेहनत आणि यश वाया घालवू शकते. क्रिप्टो जगतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती चांगपेंग झाओ याच्याबरोबरही असाच प्रसंग घडला आहे. यूएस कोर्टाने सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज बिनन्स(Crypto Exchange Binance) चे सीईओ झाओला दोषी ठरवले आणि त्याच्या कंपनीसह त्याला मोठा दंड ठोठावला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नसून झाओला तुरुंगाची हवासुद्धा खायला लागू शकते. झाओने एवढी प्रसिद्धी कशी मिळवली आणि एका झटक्यात ते कसे उद्ध्वस्त झाले ते जाणून घेऊ यात.
खरं तर यूएस न्याय विभागाने झाओ याला मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यानंतर लगेचच त्याला Binance चे CEO पद सोडावे लागले. याशिवाय न्यायालयाने त्यांच्या कंपनीला ४.३ अब्ज डॉलर (३५,८०० कोटी रुपये) दंडही ठोठावला आहे. तसेच सीईओ झाओ याला वैयक्तिकरित्या १,६०० कोटी रुपये भरावे लागणार आहेत. एवढेच नाही तर बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर केल्याच्या आरोपाखाली ते तुरुंगात जाण्याचीही शक्यता आहे. १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. अमेरिकन कायद्यानुसार, त्याच्या गुन्ह्यासाठी १० ते १८ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. बिनन्सविरोधात जवळपास वर्षभर चौकशी सुरू होती.
हेही वाचाः बक्षिसाच्या नावाखाली ५ कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; Zerodha चे CEO नितीन कामत ग्राहकांना म्हणाले…
एकट्या Binance कडे क्रिप्टो मार्केटचा अर्धा भाग
चीनमध्ये जन्मलेले झाओ १९८९ मध्ये तियानमेन स्क्वेअरवर झालेल्या हत्याकांडानंतर कॅनडात आले. तेव्हा त्यांचे वय अवघे १२ वर्षे होते. अनेक ठिकाणी काम केल्यानंतर आणि अनुभव गोळा केल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये Binance ची स्थापना केली आणि अवघ्या ६ महिन्यांनंतर ते जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज बनवले. झाओचे संपूर्ण क्रिप्टो मार्केट काबीज करण्याचे स्वप्न होते आणि त्यांनी ते मोठ्या प्रमाणात पूर्ण केले. त्यांच्या कंपनीत सुमारे ७ हजार कर्मचारी आहेत आणि एकट्या Binance कडे क्रिप्टो मार्केटचा अर्धा भाग आहे.
हेही वाचाः आता ई-सिमचे युग येणार का? ‘या’ मोठ्या कंपनीच्या सीईओंनी दिले संकेत
नेमकी चूक कुठे झाली?
झाओने स्वत: काही दिवसांपूर्वी ट्विटर म्हणजेच एक्सवर आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली होती आणि त्याची शिक्षा भोगण्यास तयार असल्याचंही सांगितलं. अखेर २२ नोव्हेंबर रोजी अमेरिकन कोर्टाने त्याला दोषी ठरवले आणि मोठा दंड ठोठावला. यूएस ऍटर्नी जनरल मेरिक गार्लंड यांनी न्यायालयाला सांगितले की, बिनन्स यांनी नियमांचे पालन केलेले नाही, ज्यामुळे गुन्हेगारांसाठी निधी इकडून तिकडे हलवणे सोपे झाले आहे.
अनेक देशांमध्ये पसरलेल्या व्यवसायांचे काय होणार?
झाओने न्यूयॉर्कमध्ये बिनन्स सुरू केले आणि नंतर टोकियो आणि शांघायमध्ये त्याचा विस्तार केला. जगातील ३ मोठ्या देशांमध्ये आपले एक्सचेंज स्थापित करून त्यांनी अवघ्या ६ महिन्यांत जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज बनवले. सध्या त्या फर्मचं बाजारमूल्य ३ लाख कोटी एवढं आहे. सध्या Binance चे वरिष्ठ कार्यकारी रिचर्ड टेंग यांना कंपनीचे नवीन CEO बनवण्यात आले आहे. झाओने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, Binance आता सुरक्षा, पारदर्शकता, अनुपालन आणि वाढीच्या पुढील स्तरावर पोहोचत आहे.