मुंबई: विविध बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी पात्र लाभार्थ्याला हस्तांतरित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या ‘उद्गम’ या संकेतस्थळाशी ३० बँका संलग्न झाल्या असल्याचे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. सुरुवातीला या मंचाशी केवळ सात बँक जोडल्या गेल्या होत्या.
विविध बँकांमध्ये पडून असलेल्या आणि दावा न केलेल्या ठेवींची माहिती सहजपणे शोधता यावी यासाठी, ‘उद्गम’ (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ॲक्सेस इन्फर्मेशन) हा रिझर्व्ह बँकेने विकसित केलेला मंच असून त्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना या ठेवींवर दावा करता येईल. सध्या या मंचाशी ३० बँका जोडल्या गेल्या असून या बँकांकडे एकूण दावा न केलेल्या रकमेपैकी सुमारे ९० टक्के ठेवींचा समावेश आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. १५ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी काही बँकांचा त्यावर समावेश केला जाईल, असे तिने सांगितले आहे.
हेही वाचा… सलग चौथ्यांदा व्याजदर अपरिवर्तित, रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेनुरूप ‘जैसे थे’ भूमिका
दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणीही दावा न केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडे असलेल्या सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या ठेवी रिझर्व्ह बँकेकडे हस्तांतरित केल्या गेल्या आहेत. यामध्ये स्टेट बँकेकडील दावा न केलेल्या ८,०८६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँक ५,३४० कोटी, कॅनरा बँक ४,५५८ कोटी आणि बँक ऑफ बडोदाकडील ३,९०४ कोटी रुपयांच्या ठेवींचा यात समावेश आहे.