बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत विस्तारलेल्या अदानी समूहातील कंपन्यांचा मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात एकत्रित निव्वळ नफा ३०,७६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वार्षिक तुलनेत त्यात ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. समूहाने दशकभरात ९० अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी २४ जानेवारी २०२३ रोजी, अदानी समूह त्यांच्याच कंपन्यांवर समभागांचे मूल्य स्वत:च बेकायदेशीररीत्या फुगवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समूहातील दहा सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. मात्र विद्यमान २०२४ मध्ये अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांनी झालेली पडझड आणि तोटा पूर्णपणे भरून काढला आहे.
हेही वाचा : देशातील प्रमुख क्षेत्रांचा एप्रिलमध्ये ६.२ टक्क्यांनी विस्तार
समूहानेही कर्ज कमी करणे, व्यवसाय मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याच्या परिणामी कंपन्यांच्या एकत्रित नफ्यात ५५ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवली गेली. आधीच्या वर्षात समूहातील सूचिबद्ध कंपन्यांनी १९,८३३ कोटी रुपयांचा एकत्रित नफा नोंदवला होता.
महसुलात ६ टक्क्यांनी घट होऊनही व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई ४० टक्क्यांनी वाढून ६६,२४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. समूहाने धोरणात्मक गुंतवणूकदारांकडून नवीन निधी उभारला, प्रवर्तकांनी समूह कंपन्यांमधील हिस्सा वाढवला आणि समूहाचे बाजारभांडवल पुन्हा वधारले आहे, असे जेफरीज या दलाली पेढीने म्हटले आहे. अदानी समूहावरील निव्वळ कर्ज सरलेल्या आर्थिक वर्षात २.३ लाख कोटी रुपयांवर स्थिर राहिले.
हेही वाचा : इंग्लंडमधील १०० टन सोने देशाच्या तिजोरीत, निम्मा सुवर्ण-साठा अजूनही परदेशात
अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर यांच्या निव्वळ कर्जात सरलेल्या वर्षात मोठी घट झाली. कंपन्यांनी हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पांमुळे अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीनच्या लाभात वाढ झाली. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अंबुजा सिमेंट या समूहातील चार कंपन्यांचे समभाग खरेदीची शिफारस जेफरीजने केली आहे.