केवळ दुय्यम बाजारच (सेकंडरी मार्केट) नवनवीन उच्चांक प्रस्थापित करतोय असे नाही तर प्राथमिक बाजारातदेखील गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीसाठी गर्दी केली आहे. प्राथमिक बाजारात अनेक कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) करून गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी निधी उभारणी केली आहे. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यमान वर्षात किती निधी उभारणी झाली?

विद्यमान वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत ३७ कंपन्यांनी आतापर्यंत ३२,००० कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. गेल्या १७ वर्षांतील ही पहिली सर्वोत्तम सहामाही ठरली आहे. याआधी २००७ मध्ये शेअर बाजार उच्चांकी पातळीवर असताना ५४ कंपन्यांनी एकत्रितपणे २०,८३३ कोटींची निधी उभारणी केली होती. यंदा को-वर्किंग स्पेस, फर्निचर, ऑनलाइन तिकीट बुकिंग अशा विविध क्षेत्रांनी बाजारात नशीब आजमावले. वर्ष २०२२ नंतर सर्वाधिक निधी उभारणी विद्यमान वर्षात झाली आहे. त्यावेळी १६ कंपन्यांनी वर्षभरात ४०,३११ कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. त्यावेळी एकट्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने सर्वाधिक १८,००० कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. एलआयसीचा आयपीओ वगळल्यास यंदाचे म्हणजे विद्यमान २०२४ हे निधी उभारणीच्या बाबतीत सर्वोत्तम वर्ष ठरले आहे.

हेही वाचा >>> जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण अचानक का वाढले?

आयपीओ बाजारातील तेजीची कारणे काय?

गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून मजबूत तरलता प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट निधी यंदा बाजारात ओतण्यात आला. तसेच दुय्यम बाजारातील तेजी देखील प्राथमिक बाजारासाठी सकारात्मक संकेत देतात. ते नवीन कंपन्यांना प्रारंभिक समभाग विक्री करण्यास प्रोत्साहित करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे, यंदाच्या वर्षातील विक्रमी व्यवहार हे गेल्या लोकसभा (वर्ष २०१९) निवडणुकीच्या वर्षांच्या तुलनेत अगदी वेगळे राहिले आहेत. त्यावेळी आयपीओ बाजारात तीव्र मंदी होती. वर्ष २०१९ च्या पहिल्या सहामाहीत केवळ आठ कंपन्यांनी ५,५०९ कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. तर त्याआधीच्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ एकच आयपीओ बाजारात आला होता. तर २०१४ मधील निवडणुकीच्या वेळी पहिल्या सहा महिन्यात बाजारात केवळ २ कंपन्यांनी आयपीओ आणले. त्यातून केवळ ३०२ कोटी रुपये उभारले होते.

परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे ओढा का?

गुंतवणूकदारांमध्ये, विशेषत: परदेशी गुंतवणूकदारांमध्ये खूप उत्साह आहे. देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने कौल मिळेल याची आधीपासून खात्री होती. यामुळे काही आठवड्यांपासून ते देशांतर्गत भांडवली बाजारात निधी ओतत आहेत.

हेही वाचा >>> T20 World Cup 2024: टीम इंडियाने असं बांलं विश्वविजयाचं तोरण

दुय्यम बाजारातील उत्साहाचे प्रतिबिंब?

भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहेत. सेन्सेक्सने ७९,००० अंश तर निफ्टीने २४,००० अंशांची महत्त्वाची पातळी गाठली आहे. शिवाय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एकसाथ धडक देणाऱ्या पाच कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. केंद्राच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’सह, टाटा टेक्नॉलॉजीज, गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि फेडबँक फायनान्शियलच्या समभागांसाठी अर्जांचा पाऊस पडला. या माध्यमातून पाच कंपन्यांकडून एकत्रित सुमारे ७,३०० कोटी उभारले जाणार होते, प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी अधिक २,४१,५४७ कोटी रुपयांच्या बोली गुंतवणूकदारांनी लावल्या. ज्या भागधारकांना आयपीओच्या माध्यमातून समभाग मिळाले नाहीत, त्यांनी खुल्या बाजारातून ते खरेदी केले. परिणामी नव्याने सूचिबद्ध झालेल्या समभागांच्या किमती दुप्पट झाल्या. हा कल बघता नवीन कंपन्या बाजारात आयपीओ आणून निधी उभारणीसाठी उत्सुक आहेत तर दुसरीकडे काही महिन्यांतच आपीओच्या माध्यमातून दुप्पट परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार आयपीओसाठी रांग लावून उभे आहेत.

तेजीत दृष्टिकोन कसा असायला हवा?

विद्यमान वर्षातील सरलेल्या सहा महिन्यात सेन्सेक्स आतापर्यंत ६.८ टक्के तर निफ्टी ८.१ टक्क्यांनी वधारला आहे. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक या कालावधीत अनुक्रमे २० आणि २०.५ टक्क्यांनी वधारले आहेत. बाजारात नव्याने सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांनीदेखील गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. सध्याच्या तेजीच्या वातावरणात, गुंतवणूकदारांनी अस्थिरतेला कारक ठरणाऱ्या घटकांचा आढावा घेत राहणे आवश्यक आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि हमास- इस्रायल संघर्ष, आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती आणि अन्नधान्यासह, प्रमुख जिनसांचा पुरवठा काय आणि कसा राहील, याचा पाठपुरावा घेत राहावाच लागेल. या अस्थिरतेचे साद-पडसाद बाजारातही उमटतच राहतील. सध्याची बाजाराची एकाच दिशेने सुरू असलेली वाटचाल अशीच सुरू राहील असे नाही. पण अशा परिस्थितीचा वापर गुंतवणूक भांडाराची नव्याने फेरमांडणी करण्यासाठी केला गेला पाहिजे. सोन्यासारख्या शाश्वत मूल्य असणाऱ्या साधनांना गुंतवणुकीत स्थान हवेच. वाढत्या महागाईने ज्या कंपन्यांच्या मिळकतीला कात्री लावली आहे, अशा कंपन्यांच्या समभागांबाबत खास जागरूकता महत्त्वाची ठरेल. गुंतवणूक सुरू ठेवावीच लागेल आणि महागाईने आपल्या बचतीचा घास घेतला जाऊ नये म्हणून काहीशी जोखीमही घ्यावीच लागेल.

आगामी काळात तेजीचा मोसम टिकेल?

जुलै महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. तिसऱ्यांदा मात्र नव्याने सत्तेत आलेले विद्यमान सरकार कोणते धोरणात्मक निर्णय घेणार यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून असेल. शिवाय अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेल्यास देशांतर्गत भांडवली बाजार आणखी नवीन उच्चांक बनवेल. शिवाय अर्थव्यवस्थेत विकासाच्या दृष्टीकोनातून संरचनात्मक बदल होत असून ती सध्या ८ टक्के दराने मार्गक्रमण करत आहे. आगामी काळात देखील हा विकासवेग कायम राहण्याची आशा आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच केले. देशाकडील परकीय गंगाजळी ६५१.५ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. जीएसटी मासिक संकलन देखील दरमहा १.७० लाख कोटी रुपयांच्या पुढे आहे. एकूणच अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक वातावरण आहे.

कोणत्या मोठ्या कंपन्या आगमनाच्या तयारीत?

येत्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका असल्याने त्याआधी पुढील तीन ते चार महिन्यांत प्राथमिक बाजारात खुल्या समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’ची नवीन लाट येण्याची शक्यता आहे. ३० हून अधिक कंपन्या येत्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना अजमावणार असून, या माध्यमातून ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यापैकी तब्बल २४ कंपन्या ३०,००० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारतील, असे संकेत आहेत. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने नुकतीच ओला इलेक्ट्रिक, एमक्युअर फार्माला प्रारंभिक समभाग विक्रीसाठी मंजुरी दिली. तर ह्युंदाईने २५,००० कोटींच्या महाकाय आयपीओसाठी, तर त्यापाठोपाठ गृहवित्त क्षेत्रात बजाज हाऊसिंग फायनान्सदेखील ‘सेबी’कडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. विद्युतशक्तीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकचा आयपीओच्या माध्यमातून ७,२५० कोटी रुपये उभारणार आहे.

गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी?

आयपीओ गुंतवणुकीचा निर्णय घेताना ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) तपासणे आवश्यक आहे. ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मध्ये कंपनीच्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातल्या योजना, मालमत्ता व जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी, याबद्दल संपूर्ण माहिती असते. हा मसुदा प्रस्ताव सेबीच्या संकेस्थळावर उपलब्ध असतो. कंपनीचा व्यवसाय कुठला आहे? कुठे आहे? कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? कंपनीचा व्यवसाय कुठे चालतो? कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.

‘ सेबी’ अथवा ‘आयपीओ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाईटवर ‘निर्देश प्रॉस्पेक्टसवरील माहिती उपलब्ध असते. ती वाचली पाहिजे.

‘ आयपीओ’च्या वेळी शेअर वाजवी किमतीला मिळतात म्हणून गुंतवणूक करणे चुकीचे आहे. भविष्यात शेअर बाजारात तो शेअर आणखी कमी किमतीला मिळू शकतो.

कंपन्यांकडून ‘आयपीओ’आधी बऱ्याचदा जाहिरातबाजी केली जाते. किंवा कंपनीच्या वस्तू आणि सेवांना किती मागणी आहे याचे चित्र रंगविले जाते. मात्र जाहिरातींतून कंपनीच्या खऱ्या कामगिरीचा अंदाज मिळेलच असे नाही. कंपनीच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती, त्यातील सातत्य आणि ‘आयपीओ’चा उद्देश बघणे आवश्यक आहे.गुंतवणूकदारांकडून ‘आयपीओ’ खुला झाल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मिळाला आहे यावरून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मात्र ‘आयपीओ’ला मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे तो गुंतवणूकयोग्य आहे, हा निकषही चुकीचा ठरू शकतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo market print exp zws
First published on: 01-07-2024 at 07:30 IST