रिझर्व्ह बँकेने जागतिक पातळीवरील भू-राजकीय अस्थिरता, कोरोना महासाथ आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून शाश्वत मूल्य असणाऱ्या सोन्याच्या साठ्यात सरलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत ४० टक्के वाढ केली आहे. ‘जागतिक सुवर्ण परिषद’ अर्थात ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या आकडेवारीनुसार, भारत सरकारकडील सुवर्णसाठा डिसेंबर २०१७ अखेर ५५९.३७ टन होता. तो विद्यमान वर्षातील एप्रिल महिन्याअखेर ७९८.४३ टनांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे २३९ टन सोने खरेदी केल्याचे यातून स्पष्ट होते.
मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २० मार्च २०२० पर्यंत देशाच्या एकूण परकीय चलनसाठ्यात सोन्याचे प्रमाण सुमारे ६ टक्के म्हणजे त्याच्या मूल्यानुसार २.०९ लाख कोटी रुपये होते. तर २४ मार्च २०२३ पर्यंत ते ७.८५ टक्क्यांपर्यंत वधारले आहे. म्हणजेच ३.७५ लाख कोटी रुपये मूल्याच्या सोन्याचा परकीय चलन गंगाजळीत समावेश केला गेला आहे.
हेही वाचाः २ हजार रुपयांच्या १.८० लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटांची बँकवापसी – आरबीआय
मध्यवर्ती बँकांकडून २०२२ मध्ये १,१३६ टन सोने खरेदी
कोरोनानंतर युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील बहुतांश बँकांनी सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यास सुरुवात केली. जागतिक महागाईचा उसळलेला आगडोंब आणि व्याजदर चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँका अधिकाधिक जोखीम-दक्ष बनल्याने त्या अक्षय्य मूल्य असलेल्या सोन्याचा आश्रय घेत आहेत. रिझर्व्ह बँकेनेही तोच मार्ग अनुसरताना सुवर्ण संचय वाढवत नेला आहे. जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांनी वर्ष २०२२ मध्ये ७० अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचे १,१३६ टन सोने खरेदी केले आहे. सोने हे सीमांचे बंधन नसलेल्या चलनासारखे आहे, म्हणजेच कोणत्याही देशात त्याला मान्यता असल्याने जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात ते एक सुरक्षित मालमत्तेचे साधन ठरते.
हेही वाचाः ५०० च्या नोटा बंद करण्याचा किंवा १०००च्या सुरू करण्याचा सरकारचा विचार नाही – शक्तिकांत दास
परकीय चलन गंगाजळीतील सुवर्णसाठा
तारीख मूल्य (लाख कोटी रुपये) डॉलरमध्ये (कोटी)
२० मार्च २०२० २.०९ २,७८५.६
१९ मार्च २०२१ २.५१ ३,४६८.१
१८ मार्च २०२२ ३.१८ ४,२०१.१
२४ मार्च २०२३ ३.७५ ४,५४८.०