मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदीचा सपाटा आणि देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर एकंदर उत्साही वातावरण कायम आहे. परिणामी जूनमध्ये ४२ लाखांहून अधिक डिमॅट खाती नव्याने उघडण्यात आली, जो जून महिन्यात चार महिन्यांचा उच्चांक असून, देशातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या त्यातून १६ कोटींच्या पुढे पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जूनमध्ये शाकाहारी थाळी महाग; मांसाहारी थाळी मात्र स्वस्त!

भारतात सध्या कार्यरत असलेल्या एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांना डिमॅट खाते उघडता येते. सीडीएसएल आणि एनएसडीएल यांच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये उघडलेल्या डिमॅट खात्यांची संख्या ४२.४ लाखांपेक्षा जास्त आहे. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये ३६ लाख आणि गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजेच जून २०२३ मध्ये २३.६ लाख खाती उघडली गेली होती. मासिक ४० लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेल्याची ही आतापर्यंची चौथी वेळ आहे. यापूर्वी डिसेंबर २०२३, जानेवारी २०२४ आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने डिमॅट खाती उघडली गेली होती. एकूण डिमॅट खात्यांची संख्या आता १६.२ कोटींहून अधिक झाली आहे, जी मागील महिन्याच्या तुलनेत ४.२४ टक्के आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.६६ टक्क्यांच्या वाढीला दर्शविते. विश्लेषकांच्या मते, केंद्रातील सरकारकडून धोरण सातत्याची हमी, अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी, दरकपातीची आशा, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ यामुळे भारतीय भांडवली बाजार विक्रमी शिखरावर पोहोचला आहे. हीच स्थिरता गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात प्रवेशास प्रोत्साहित करत आहे. याचबरोबर मजबूत परताव्यासह आणि सध्या कोणतीही पडझड न होता एकाच दिशेने दिसणारी तेजीही नवीन गुंतवणूकदारांना मोहवणारी ठरली आहे. शिवाय ‘आयपीओ’द्वारे बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या कंपन्यांकडूनही गुंतवणूकदारांना बहुप्रसवा परतावा मिळत असल्याने नवीन गुंतवणूकदार तो नफा पदरात पाडण्याच्या दृष्टिकोनातून बाजाराची वाट धरत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 42 lakh new demat accounts added in june total crosses rs 16 crore zws
Show comments