पीटीआय, नवी दिल्ली : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील १० सूचिबद्ध कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत ४२ टक्के वाढ नोंदवली आहे. समूहाच्या विमानतळ ते ऊर्जा आणि बंदर या व्यवसायांमध्ये चांगली वाढ झाली आहे. अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, समूहाचा करपूर्व नफा एप्रिल ते जून तिमाहीत २५ हजार ५३२ कोटी रुपये आहे. समूहाच्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील एकूण करपूर्व नफा २४ हजार ७८० कोटी रुपये होता. त्यापेक्षा अधिक नफा केवळ एका तिमाहीत समूहाने नोंदविला आहे.
अदानी समूहाच्या दहा सूचिबद्ध कंपन्या आहेत. अदानी एंटरप्रायझेस ही प्रमुख कंपनी आणि बंदर क्षेत्रातील अदानी पोर्ट्स अँड सेझ, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अदानी ग्रीन एनर्जी, वीज क्षेत्रातील अदानी पॉवर, वीज वितरण क्षेत्रातील अदानी एनर्जी सोल्यूशन्स आणि वायू क्षेत्रातील अदानी टोटल गॅस या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्यांवरील निव्वळ कर्ज १८ हजार ६८९ कोटी रुपये असून, कंपन्यांकडील रोख गंगाजळी ४२ हजार ११५ कोटी रुपये आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातून समूहाला सर्वाधिक स्थिर महसूल मिळाला आहे. या क्षेत्रातून समूहाला २० हजार २३३ कोटी रुपयांचा करपूर्व नफा मिळाला असून, एकूण करपूर्व नफ्यात त्याचे प्रमाण ८६ टक्के आहे, असे समूहाने स्पष्ट केले आहे.
कामगिरी सुधारण्याचे आव्हान
हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी महिन्यातील अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांतील गैरप्रकारांवर ठपका ठेवणारा अहवाल जाहीर केला होता. त्यानंतर या कंपन्याचे समभाग भांडवली बाजारात गडगडले होते. त्यावेळी या कंपन्यांच्या बाजारमूल्यात १५० अब्ज डॉलरची घसरण झाली होती. आता समूहासमोर कामगिरी सुधारण्याचे आव्हान त्यावर जास्त भर दिला जात आहे.