मुंबईः नावीन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनेसह उद्योजकतेची कास धरणाऱ्या नवोद्यमी (स्टार्टअप्स) उपक्रमांना आवश्यक असणाऱ्या सर्व बँकिंग सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुरू केलेल्या मुंबईतील चौथ्या विशेष शाखेचे उदघाटन भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा, यांनी सोमवारी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील या विशेष नवोद्यमी शाखेचे प्राथमिक उद्दिष्ट स्टार्टअप्सना त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर समर्थन प्रदान करणे असे असल्याचे खरा यांनी सांगितले. देशात बेंगळूरुनंतर ‘युनिकॉर्न’ अर्थात व्यावसायिक यशाची मोठी उंची गाठणाऱ्या नवोद्यमींची संख्या मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नियमित बँकिंग सेवांव्यतिरिक्त, बँकेच्या उपकंपन्यांद्वारे गुंतवणूक बँकिंग, ट्रेझरी/फॉरेक्स, सल्लागार आणि इतर आनुषंगिक वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी ही शाखा काम करेल. मुंबईतील या स्टार्टअप्स शाखांसाठी स्टेट बँकेने आयआयटी, मुंबई येथील सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंन्त्रप्रेन्योरशिप, सेंटर फॉर इनक्युबेशन अँड बिझनेस ॲक्सिलरेशन आणि एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्याशी सामंजस्य करार केले आहेत.