वृत्तसंस्था, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांकडून अनुभव नसलेल्या नवपदवीधर उमेदवारांना पसंती दिली जात असून, गेल्या सहा महिन्यांत अशा नवीन उमेदवारांची या क्षेत्रात मागणी ५ टक्क्यांनी वाढली आहे. नवीन उमेदवारांना संधी देण्यात आयटी आणि मनुष्यबळ क्षेत्राचा वाटा अनुक्रमे ३२ आणि १२ टक्के असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.
‘फाउंडइट’ संस्थेने रोजगार भरतीचा हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, रोजगार भरतीचा निर्देशांक मे महिन्यात २९५ वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात तो २६५ होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत भरतीत ११ टक्के वाढ झाली असून, रोजगाराच्या संधी वाढल्याचे हे निदर्शक आहे. क्षेत्रनिहाय विचार करता उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रातील भरतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक ४७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. सरकारकडून उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर सवलती (पीएलआय), पायाभूत सुविधांचा विकास आणि आयातीत व निर्यातीत धोरणात्मक हस्तक्षेप यावर भर दिला जात आहे. यामुळे निर्मिती क्षेत्राने गती पकडली आहे.
हेही वाचा >>>सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई आशियातून २१ व्या स्थानावर, पुण्यासह अन्य शहरं कितव्या स्थानी?
घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रिक सुट्या भागांच्या क्षेत्रात भरतीत ३५ टक्के वाढ झाली आहे. दूरसंचार क्षेत्रात भरतीमधील वाढ ९ टक्के आहे. दूरसंचार सेवा क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि थेट परकीय गुंतवणुकीचे नियम शिथिल झाल्याने ही सुधारणा दिसून येत आहे. आरोग्य क्षेत्रातही मनुष्यबळ भरतीमध्ये वाढ होताना दिसून आली आहे. या क्षेत्रातील भरतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत ४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मनुष्यबळ भरतीत संघटित किराणा (रिटेल) १८ टक्के, तेल व नैसर्गिक वायू २२ टक्के, बांधकाम २० टक्के आणि आयटी २० टक्के अशी वाढ झाली आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी, जहाजबांधणी क्षेत्रात मात्र घट
मनुष्यबळ भरतीमध्ये कृषी उद्योगात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भरतीत १६ टक्क्यांची घसरण या क्षेत्रात अनुभवास आली आहे. याचबरोबर जहाजबांधणी क्षेत्रात ३० टक्के, जलद खप असलेली ग्राहकोपयोगी उत्पादने (एफएमसीजी) क्षेत्रात ९ टक्के आणि आयात व निर्यात क्षेत्रातील भरतीत १६ टक्के घट झाली आहे, असे ‘फाउंडइट’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.