मुंबई: रिझव्र्ह बँकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरास खुल्या केलेल्या ‘डिजिटल-रुपी’ या अधिकृत डिजिटल चलनाच्या वापरकर्त्यांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर पाच हजारांहून अधिक व्यापारी या आभासी चलनाचा वापर करत आहेत, अशी माहिती रिझव्र्ह बँकेने बुधवारी दिली.
डिजिटल रुपी हे रोखीतील चलनाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप असून यामुळे रोखीचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतात. प्रायोगिक तत्त्वावर वापरास खुले खुल्या केलेल्या ‘ई-रुपी’च्या पथदर्शी प्रयोगात, धीम्या गतीने पुढे जाण्याचे रिझव्र्ह बँकेने निश्चित केले असून, त्याचे संभाव्य परिणाम समजून घेईपर्यंत व्यवहार मर्यादित प्रमाणात सुरू ठेवण्यात आले आहेत. सध्या केवळ महानगरांमध्ये नऊ बँकांना विनिमयासाठी निश्चित करण्यात आले आहे आणि आणखी पाच बँकांच्या माध्यमातून लवकरच व्यवहार विस्तार करण्यात येणार आहे.
किरकोळ वापरास १ डिसेंबरपासून सुरुवात झाल्यापासून, या पथदर्शी प्रकल्पात ७.७० लाख व्यवहार पार पडले आहेत. सध्या पाच शहरांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. या यादीत आणखी नऊ शहरे समाविष्ट करण्याची योजना आहे, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले. ‘ई-रुपी’च्या विनिमयासाठी रिझव्र्ह बँकेने सरकारी आणि खासगी क्षेत्रातील निवडक नऊ प्रमुख बँकांचा समावेश केला होता. त्यात स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फस्र्ट बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक मिहद्रा बँकेचा समावेश आहे.
जी-२० देशातील प्रवाशांना भारतात ‘यूपीआय’ वापर शक्य
रिझव्र्ह बँकेने जी-२० देशातून निवडक विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांना देशातील लोकप्रिय देयक प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’च्या वापरास परवानगी दिली आहे. विविध बँक खात्यांद्वारे मोबाइल फोनसारख्या एकाच माध्यमातून देयक व्यवहार पूर्ण करता येऊ शकणारी ‘यूपीआय’ ही अत्यंत सोपी, सुरक्षित प्राणाली आहे. भारताकडे १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या एका वर्षांसाठी जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद आले आहे.
जी-२० हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा गट आहे. त्यात अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय देशांचा समावेश आहे. यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या जानेवारी महिन्यात १.३ टक्क्यांनी वाढून त्याचे व्यवहार मूल्य १३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
सुटय़ा पैशांचा प्रश्न सुटणार
रिझव्र्ह बँक देशातील १२ शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर क्यूआर कोड आधारित ‘कॉईन वेंडिंग मशीन’ बसवणार आहे. ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करून ‘यूपीआय’च्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातील रकमेच्या बदल्यात या मशीनमधून नाणी मिळवू शकणार आहेत. ज्यामुळे सुटय़ा पैशांचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे.