नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या ३१ जुलै या अंतिम मुदतीपर्यंत एकूण ७.२८ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली, ही संख्या मागील कर-निर्धारण वर्षाच्या तुलनेत ५१ लाखांनी अर्थात ७.५ टक्क्यांनी अधिक आहे, असे प्राप्तिकर विभागाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी एकूण ६.७७ कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल केली होती. पगारदार करदात्यांना आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता नाही अशा करदात्यांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ होती.
हेही वाचा >>> दोन हजारांच्या ७,४०९ कोटी मूल्याच्या नोटा अजूनही परतल्या नाहीत – रिझर्व्ह बँक
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बहुतांश म्हणजेच ७२ टक्के करदात्यांनी नवीन कर प्रणालीचा स्वीकार केला आहे. या प्रणालीनुसार ५.२७ कोटी करदात्यांसाठी विवरणपत्र भरले आहे. तर २.०१ कोटी करदात्यांनी जुनी कर प्रणालीनुसार विवरणपत्र दाखल केले आहे. उल्लेखनीय म्हणजे जुन्या कर प्रणालीला पसंती देणाऱ्या करदात्यांचे प्रमाण २८ टक्क्यांवर कायम आहे.
हेही वाचा >>> टाटा मोटर्सच्या दोन कंपन्यांतील विभाजन योजनेला मान्यता
विवरणपत्र दाखल करण्याच्या ३१ जुलै या अखेरच्या दिवशी सुमारे ६९.९२ लाखांहून अधिक विवरणपत्र दाखल केली गेली. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळावर विवरणपत्रे दाखल होण्याचे तासाला सरासरी ५.०७ लाख असे होते. यंदा ५८.५७ लाख करदात्यांनी प्रथमच विवरणपत्र दाखल केले आहे. दाखल ७.२८ कोटी विवरणपत्रांपैकी, सर्वाधिक ३.३४ कोटी करदात्यांनी आयटीआर-१ नमुना अर्ज वापरात आणला. १.०९ कोटी करदात्यांनी आयटीआर-२, ९१.१० लाख करदात्यांनी आयटीआर-३, १.८८ कोटी करदात्यांनी आयटीआर-४ आणि ७.४८ लाख करदात्यांनी आयटीआर-५ ते ७ नमुन्यात अर्ज दाखल केले.