देशातील नव्या पिढीची ‘५जी’ सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या चालू वर्षाच्या अखेरपर्यंत एक कोटीवर पोहोचण्याचा अंदाज आहे, तर पुढील पाच वर्षांत म्हणजेच २०२८ पर्यंत एकूण ५७ टक्के मोबाईलधारकांचे ‘५जी’कडे संक्रमण झालेले दिसेल, अशी शक्यता ‘एरिक्सन मोबिलिटी’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने वर्तवली आहे.
भारत हा जागतिक पातळीवर वेगाने ‘५जी’ सेवा विस्तारणारा देश ठरेल, असा ‘एरिक्सन मोबिलिटी’च्या अहवालाचा दावा आहे. अहवालात नमूद निरीक्षणानुसार, भारतात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘५जी’ सेवा सुरू झाली. डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशातील ‘५जी’चे जाळे अतिशय वेगाने विस्तारत आहे. काही देशांमध्ये भू-राजकीय आव्हाने आणि आर्थिक मंदी यामुळे हा विस्तार रखडला आहे. जगभरात मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांकडून ‘५जी’मध्ये गुंतवणूक सुरू आहे. देशातील ‘५जी’ सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या चालू वर्षाच्या अखेरपर्यंत १ कोटीवर जाईल. देशात २०२८ मध्ये एकूण मोबाईल सेवेपैकी ५७ टक्के ग्राहक ‘५जी’ सेवेतील असतील.
हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता
चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे १५० कोटी लोक ‘५जी’ सेवा वापरणार
जगभरात चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे १५० कोटी लोक ‘५जी’ सेवा वापऱणारे असतील. उत्तर अमेरिकेने यात जोरदार आघाडी घेतली आहे. तिथे मागील वर्षी एकूण मोबाईलधारकांमध्ये ‘५जी’ सेवेचे प्रमाण ४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. जागतिक पातळीवर स्मार्टफोनचा वापर वाढत आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस जागतिक पातळीवर सरासरी मासिक डेटा वापर २० जीबी प्रति स्मार्टफोनपर्यंत पोहोचेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी
जागतिक पातळीवर ‘५जी’ सेवेची स्वीकारार्हता वाढत आहे. आता ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांसाठी उत्पन्नाची नवीन संधी निर्माण झाली आहे, असंही एरिक्सनचे कार्यकारी उपाध्यक्ष फ्रेडरिक जेडलिंग म्हणालेत.