नवी दिल्ली : भारतासह जगभरात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांची (ईव्ही) मागणी वाढत आहे. येत्या काळात जगभरातील विविध भागांमध्ये १० पैकी सहापेक्षा अधिक ग्राहक पुढील खरेदीसाठी ‘ईव्ही’चा विचार करण्याची शक्यता आहे, असे आघाडीची माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने केलेल्या पाहणीतून मंगळवारी पुढे आले.
‘ईव्ही’ची स्वीकारार्हता मोठ्या प्रमाणावर वाढत असली तरी ६० टक्के ग्राहक चार्जिंगसंबंधित पायाभूत सुविधांची वानवा हे एक मोठे आव्हान मानतात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, चीन, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील १,३०० हून अधिक अनामिक प्रतिसादकर्त्यांचे टीसीएसने सर्वेक्षण केले आहे. यापैकी ५६ टक्के लोकांनी पसंतीच्या ‘ईव्ही’साठी ४०,००० अमेरिकी डॉलर (सुमारे ३५ लाख रुपये) खर्च करण्याचीही तयारी दर्शविली.
हेही वाचा >>> JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
‘टीसीएस फ्यूचर-रेडी ई-मोबिलिटी स्टडी २०२५’ या पाहणीतील प्रतिसादकर्त्यांमध्ये वाहन उत्पादक, चार्जिंग पायाभूत सुविधा, फ्लीट ॲडॉप्टर, ग्राहक आणि ईव्ही ॲडॉप्शन इन्फ्लुएंसर यांचा समावेश होता, असे टीसीएसने म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार, ९० टक्के उत्पादकांचा असा होरा आहे की, बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे वाहनाचे एका चार्जिंगमध्ये अंतर गाठण्याचे प्रमाण आणि चार्जिंगचा वेग वाढेल आणि इतर तांत्रिक प्रगतीच्या तुलनेत लवकरच ईव्हीच्या डिझाइन आणि कामगिरीवर लक्षणीय परिणाम होईल.
ग्राहकांच्या दृष्टिकोनातून, ६० टक्के ग्राहकांनी चार्जिंग पायाभूत सुविधा हे एक मोठे आव्हान असल्याचे म्हटले, तर ६४ टक्के लोकांनी त्यांचे पुढील वाहन म्हणून ईव्हीलाचा पसंती देण्याची शक्यता बोलून दाखविली आणि ५६ टक्के लोक पारंपारिक वाहनाच्या तुलनेत ईव्हीसाठी ४०,००० अमेरिकी डॉलरही खर्ची घालण्यास तयार आहेत.
हेही वाचा >>> Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
मनोरंजक गोष्ट म्हणजे, पाहणीनुसार अमेरिकेतील ७२ टक्के ग्राहक त्यांचे पुढील वाहन म्हणून ‘ईव्ही’ खरेदी करण्याची शक्यता आहे. श्रेणीच्या बाबतीत, ४१ टक्के लोक म्हणाले की, एका चार्जवर वाहनाने अंतर गाठण्याची श्रेणी २००-३०० मैल असावी.
‘ईव्ही’ उद्योग एका निर्णायक वळणावर असून जो उत्पादन आणि परिवर्तनाच्या गुंतागुंतीतून मार्गक्रमण करत आहे. सुमारे दोन तृतीयांश ग्राहक त्यांच्या पुढील वाहनासाठी ‘ईव्ही’ला झुकते माप देण्यास उत्सुक असले तरी, बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगती, जटील डिझाइन आणि उत्पादन यातील ताळमेळ साधण्यासाठी विविध आव्हानांना उत्पादकांना तोंड द्यावे लागत आहे.
– अनुपम सिंघल, उत्पादन अध्यक्ष, टीसीएस