भारतातील अतिश्रीमंत देश सोडून परदेशात स्थायिक होत आहेत. अतिश्रीमंताचा देश सोडून परदेशात जाण्याचा कल यावर्षीही कायम राहणार आहे. चालू वर्षात ६ हजार ५०० अतिश्रीमंत देश सोडून जातील, असा अंदाज ‘हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन’ अहवालात वर्तवण्यात आला आहे. मागील वर्षी तब्बल ७ हजार ५०० अतिश्रीमंत भारत सोडून परदेशात स्थायिक झाले. जगात देश सोडून परदेशात स्थायिक होणारे सर्वाधिक नागरिक चीनचे आहेत.
चीन याबाबतीत पहिल्या स्थानी आहे. चीनचे १३ हजार ५०० कोट्यधीश यंदा देश सोडतील असा अंदाज आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी भारत असून, ६ हजार ५०० कोट्यधीश देश सोडून परदेशात जातील, अशी शक्यता आहे. ही संख्या ब्रिटनमध्ये ३ हजार २०० आणि रशियामध्ये ३ हजार आहे. रशियात ही संख्या मागील वर्षी ८ हजार ५०० होती. त्याला रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेले युद्ध कारणीभूत होते, असे अहवालात म्हटले आहे.
भारतातील अतिश्रीमंत कुटुंबीयांसह देश सोडण्यामागे अनेक कारणे आहेत. यात सुरक्षितता हे कारण असले तरी त्यासोबत शिक्षण, आरोग्य सुविधा, हवामान बदल अशी काऱणे आहेत. या अतिश्रीमंतांना त्यांच्या गुंतवणुकीच्या जोरावर अनेक देश नागरिकत्व देत आहेत. अनेक देशांनी ठराविक गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व देण्याचे नियमही केले आहेत. याचबरोबर अतिश्रीमंत गुंतवणुकीची संधी आणि व्यवसाय विस्तार डोळ्यासमोर ठेवूनही परदेशात स्थलांतरित होत आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचाः ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये आले १०३ कोटी रुपये, गुंतवणुकीसाठी समजला जातो सुरक्षित पर्याय
सर्वाधिक पसंती दुबई अन् सिंगापूरला
देश सोडून जाणाऱ्या अतिश्रीमंत भारतीय कुटुंबांची सर्वाधिक पसंती दुबई आणि सिंगापूरला आहे. याला जागतिक गुंतवणूक केंद्र अशी असलेली त्यांची ओळख कारणीभूत आहे. दुबई आणि सिंगापूरकडून गुंतवणूकदारांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. तेथील करप्रणाली जाचक नसून व्यवसायाचे वातावरण चांगले आहे. तसेच, तेथील परिस्थिती सुरक्षित आणि शांततापूर्ण आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.