एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर अडचणी आणि आव्हाने तुमचा मार्ग रोखू शकत नाहीत. देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअप्स संस्थापक रुची कालरा यांनी हे सत्यात उतरवून दाखवले आहे. त्यांच्या व्यवसायाची कल्पना एक, दोन नव्हे तर तब्बल ७३ गुंतवणूकदारांनी नाकारली. परंतु रुची यांनी हार मानली नाही आणि पती आशिष महापात्रा यांच्यासोबत पैसे जमवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ते अशा प्रकारे मिळाले की, त्यांनी एक नव्हे तर दोन युनिकॉर्न स्टार्टअप्स उभे केले. या दोघांचे एकूण बाजारमूल्य आज ५२ हजार कोटी रुपये आहे. ऑफ बिझनेस आणि ऑक्सिझो हे दोन्ही स्टार्टअप्स सध्या फायद्यात आहेत. एक काळ असा होता जेव्हा लोक त्यांच्या व्यवसायाची कल्पना फायदेशीर मानत नव्हते. पण रुचीला व्यवसायातून कशा पद्धतीने नफा मिळवायचा याची कल्पना होती.
व्यवसाय कसा सुरू झाला?
रुची यांनी पती आशिषसोबत २०१५ मध्ये पहिल्यांदा ऑफ बिझनेसचा पाया घातला. हे व्यावसायिक व्यासपीठ आहे, जे उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करते. सध्या या स्टार्टअपने ४४ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय रुची Oxyzo Financial Services च्या CEO देखील आहेत. ही ऑफ बिझनेसचीच कर्ज देणारी शाखा आहे. Oxyzo ने अलीकडेच २०० दशलक्ष डॉलर निधी मिळवला आणि त्याचे मूल्यांकन सुमारे ८२०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अशा प्रकारे ती एक युनिकॉर्न कंपनी बनली आहे. रुची आणि आशिष हे प्रत्येकी दोन यशस्वी युनिकॉर्न चालवणारे देशातील पहिले जोडपे आहे.
हेही वाचाः एअर इंडियाला मिळणार ‘ताकद’; आता भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर राज्य करण्यास सज्ज
कशा पद्धतीने अभ्यास केला?
रुची आणि तिचा नवरा दोघेही आयआयटीयन आहेत आणि त्यांनी आयआयटी दिल्लीतून बी-टेक केले आहे. २०१७ मध्ये त्यांनी Oxyzo ची स्थापना केली, जी त्यांच्या इतर प्लॅटफॉर्मवरून वस्तू खरेदी करणाऱ्यांना आर्थिक मदत करते. त्यांची कंपनी लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देते. इतकेच नाही तर कालरा गेल्या ८ वर्षांपासून मॅकेन्झीसोबत जवळून काम करीत आहेत. त्यांचे आणि पतीचे ऑफिस गुरुग्रामला आहे.
हेही वाचाः देशाच्या प्रगतीला बाधा पोहोचणार, भारतातील ९० टक्के भाग ‘डेंजर झोन’मध्ये
सुरुवातीला होते आव्हान मग स्थिर नफा मिळाला
रुची कालरा यांनी २०१६ मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यांची व्यवसाय कल्पना सुरुवातीला ७३ गुंतवणूकदारांनी नाकारली होती. पण रुचीचा असा विश्वास होता की, कंपनी उभी करण्यासाठी त्यांना फक्त एक संधी हवी होती. अखेर ही संधी मिळाली आणि त्यानंतर रुची यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल १९७ कोटी होता, जो पुढील आर्थिक वर्षात ३१३ कोटींवर पोहोचला. यादरम्यान त्यांचा नफा केवळ ६० कोटींहून अधिक होता.