7th Pay Commission : केंद्रातल्या मोदी सरकारचे सर्व कर्मचारी जुलै महिन्याच्या डीए वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. डीए वाढीच्या घोषणेच्या तारखेसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये डीए वाढीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, जुलैमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, अशा परिस्थितीत सरकार महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांनी वाढवून ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहे. १ जुलै २०२३ पासून महागाई भत्ता दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) नव्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो.
फेडरेशन चार टक्के वाढीची मागणी करत आहे
पीटीआयने अलीकडेच ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांच्या हवाल्यानं महत्त्वाची माहिती दिली आहे. आम्ही महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची मागणी करीत आहोत. पण महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे डीए तीन टक्क्यांनी वाढून ४५ टक्के होण्याची शक्यता आहे. मिश्रा पुढे म्हणाले की, अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग डीए वाढीसाठी प्रस्ताव तयार करेल आणि मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवेल. त्यानंतर डीए वाढीची घोषणा केली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांना DA आणि पेन्शनधारकांना DR मिळतो
सध्या एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना डीए मिळतो, तर पेन्शनधारकांना डीआर म्हणजेच महागाई सवलत दिली जाते. जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा DA आणि DR वाढवला जातो. शेवटची डीए वाढ मार्च २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि ती ४ टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आली होती. विविध अहवालांनुसार, सध्याच्या महागाई दराचा विचार करता DA वाढ ३ टक्के असू शकते.