मुंबई : देशातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समूहांतील बजाज फिनसर्व्हचा एक मुख्य भाग असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी २५ ते ३५ महिन्यांच्या कालावधीतील मुदत ठेवींच्या व्याजदरात ६० आधारबिंदूंची (०.६ टक्क्यांपर्यंत) वाढ केली आहे. तर १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदरात ४० आधारबिंदूंची (०.४ टक्क्यांपर्यंत) वाढ केली आहे.
हे नवीन व्याजदर ३ एप्रिलपासून लागू झाले आहेत.तसेच सर्व नागरिकांसाठी, २५ ते ३५ महिन्यांच्या कालावधीतील ठेवींवरील व्याजदरात ४५ आधारबिंदूंची वाढ केली आहे. तर १८ आणि २२ महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदरात ४० आधारबिंदूंची, तर ३० आणि ३३ महिन्यांच्या कालावधीच्या ठेवींसाठी ३५ आधारबिंदूंची वाढ केली आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मुदत ठेवींवर ८.८५ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळवू शकतात, तर सामान्य ग्राहकांना ४२ महिन्यांच्या कालावधीच्या मुदत ठेवीवर ८.६० टक्के दराने व्याज मिळेल.