मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपन्या त्यांच्या भागधारकांना कायमच घसघशीत लाभांश देत आल्या आहेत, याच परंपरेत ‘महारत्न’ दर्जा असलेल्या ‘एनटीपीसी’ने विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ८,००० कोटी रुपयांचा लाभांश भागधारकांमध्ये वितरित केला आहे.
कंपनीने मार्च २०२५ अखेर समाप्त होत असलेल्या वर्षासाठी आणखी २,४२४ कोटी रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश मंगळवारी वितरित केला. याआधी नोव्हेंबर २०२४ मध्ये २,४२४ कोटी रुपयांच्या पहिला अंतरिम लाभांश दिला गेला, असे एनटीपीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या व्यतिरिक्त जुलैनंतर भागधारकांना कंपनीकडून अंतिम लाभांशाचा नजराणा दिला जाईल.चालू आर्थिक वर्षात कंपनीकडून वितरित एकूण लाभांश ८,००० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे, ज्यामध्ये सप्टेंबर २०२४ मध्ये दिलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशापोटी ३,१५२ कोटी रुपयांचा समावेश आहे. एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज निर्मिती कंपनी असून, ती ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते.