मुंबई : चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३१ जुलै २०२३ अखेर बँकांकडे ८८ टक्के नोटा जमा केल्या गेल्या असून, चलनात असलेल्या ३.६२ लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी बँकिंग प्रणालीमध्ये ३.१४ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकेने मंगळवारी दिली.
रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याचा निर्णय घेतला आणि ३० सप्टेंबपर्यंत बँकांमध्ये या नोटा जमा करण्याच्या किंवा त्याच मूल्याच्या दुसऱ्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. त्यानंतर, दोन तृतीयांशपेक्षा अधिक म्हणजे जवळपास ८८ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असून अजूनही सुमारे ४२ हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आलेल्या नाहीत. परत आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी ८७ टक्के ठेवी स्वरूपात आल्या आणि उर्वरित सुमारे १३ टक्के नोटा अन्य मूल्याच्या नोटांमध्ये बदलण्यात आल्या आहेत.
नागरिकांकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि/किंवा बदलण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आणखी दोन महिन्यांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले आहे.