वृत्तसंस्था, मुंबई
फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) व्यवहारांमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांना तोटा होण्याचे प्रमाण कायम आहे. यात १० पैकी ९ गुंतवणूकदारांना तोटा होत असल्याचे वास्तव भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या ताज्या अभ्यासातून समोर आले आहे. याआधी सेबीने जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीच्या अहवालात ८९ टक्के गुंतवणूकदारांना एफ अँड ओमध्ये तोटा होत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

एफ अँड ओ व्यवहारांमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढतच आहे. सेबीने तीन वर्षांतील या गुंतवणूकदारांना झालेला फायदा आणि तोटा तपासला आहे. सेबीच्या या अभ्यासानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२३ -२४ या तीन वर्षांच्या कालावधीत एफ अँड ओ व्यवहारांत १ कोटी वैयक्तिक गुंतवणूकदारांपैकी ९३ टक्के जणांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा तोटा झाला. या प्रकारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एकूण १.८ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. एफ अँड ओ व्यवहारांमध्ये ३ वर्षांत ३.५ टक्के म्हणजेच ४ लाख गुंतवणूकदारांना प्रत्येकी सरासरी २८ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. याचवेळी केवळ १ टक्के गुंतवणूकदारांना नफा झाला आहे. हा नफा प्रत्येकी १ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा >>>‘…तर ७५ टक्के युजर UPI पेमेंट करणं बंद करतील’, ताज्या सर्व्हेमधून समोर आले निष्कर्ष!

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या तुलनेत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अनुक्रमे ३३ हजार कोटी आणि २८ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. याच कालावधीत वैयक्तिक गुंतवणूकदारांना ६१ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, असे सेबीने म्हटले आहे.

हेही वाचा >>>Share Market Today : ‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; १००० अकांच्या वाढीसह सेन्सेक्सने गाठला विक्रमी उच्चांक, निफ्टीतही वाढ

सरासरी २६ हजारांची गुंतवणूक

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये वैयक्तिक गुंतवणूकदाराने एफ अँड ओ व्यवहारांमध्ये प्रत्येकी २६ हजार रुपये गुंतविले. एकूण ३ वर्षांत वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून ५० हजार कोटी रुपयांचे व्यवहार शुल्क मिळाले. त्यातील ५१ टक्के ब्रोकरेज शुल्क आणि २० टक्के बाजार शुल्क आहे, असेही सेबीने नमूद केले आहे.