पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील रोजगारांमध्ये पुढील वर्षी ९ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी), रिटेल, दूरसंचार आणि बँकिंग, वित्तीय सेवा व विमा (बीएफएसआय) या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या जास्त संधी निर्माण होतील, असा ‘फाऊंडइट’च्या ताज्या अहवालाचा अंदाज आहे.

रोजगार व गुणवत्ता मंच असलेल्या ‘फाऊंडइट’च्या अहवालानुसार, देशात २०२५ मध्ये मुख्यत्वे माहिती-तंत्रज्ञान, रिटेल, दूरसंचार आणि बँकिंग, वित्तीय सेवा व विमा या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ९ टक्क्यांनी वाढतील. यंदा रोजगारांत १० टक्के वाढ झाली असून, नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ही वाढ ३ टक्के आहे. आगामी काळातही वाढीचा हा दर कायम राहण्याची चिन्हे आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख व्यवसाय हे देशातील रोजगाराच्या बाजारपेठेला पुढील वर्षात आकार देतील. एज कॉम्प्युटिंग, क्वांटम ॲप्लिकेशन्स आणि सायबर सुरक्षा यातील नावीन्यपूर्ण संशोधनामुळे निर्मिती, आरोग्य सुविधा आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे स्वरूप पालटणार असल्याचे अहवाल सांगतो.

हेही वाचा >>>‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा

फाऊंडइटच्या इनसाइट ट्रॅकरच्या माध्यमातून जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील उपलब्ध विदेच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, रिटेल मीडिया नेटवर्क्सची वाढ होत असून, कृत्रिम प्रज्ञा आधारित मूल्यांकनामुळे ई-कॉमर्स, मनुष्यबळ आणि डिजिटल सेवा या क्षेत्रातील गुणवत्तेच्या गरजा बदलतील. कंपन्यांकडून डिजिटल विपणन, जाहिरात व्यवस्थापन आणि मनुष्यबळ मूल्यांकन यातील कुशल मनुष्यबळाला प्रधान्य दिले जाईल.

देशातील रोजगार बाजारपेठेची कक्षा २०२५ मध्ये आणखी विस्तारणार आहे. कंपन्या केवळ अनुभवी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर नवीन मनुष्यबळालाही संधी देतील. ज्यातून नोकऱ्यांचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढेल.- अनुपमा भीमराजका, उपाध्यक्षा, फाऊंडइट

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 percent growth in employment expected in the country highest opportunities in it telecom retail print eco news amy