पीटीआय, नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील नवउद्यमी दुकान कंपनीने ग्राहक सेवा विभागातील ९० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यांच्या जागी कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित चॅटबॉटचा वापर सुरू केला आहे. याबाबत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित शहा म्हणाले की, नफा वाढविण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ग्राहक सेवा विभागातील ९० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे खर्चात ८५ टक्के कपात झाली आहे. त्याचवेळी ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याचा कालावधी दोन तासांवरून कमी होऊन तीन मिनिटांवर आला आहे.
दुकानच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयावर समाज माध्यमामध्ये टीका करण्यात आली आहे. यावर शहा म्हणाले की, सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता नवउद्यमींकडून नफा मिळविण्यास प्राधान्य दिले जात आहे. सर्वच नवउद्यमी युनिकॉर्न (१ अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेली कंपनी) बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हीही तोच प्रयत्न करीत आहोत. कृत्रिम प्रज्ञेवर आधारित लिना चॅटबॉटचा वापर करण्यात येत आहे. ग्राहकांना विलंबाने मिळणारा प्रतिसाद यामुळे कमी झाला आहे.
चंद्रशेखर यांचा अंदाज चुकला
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कृत्रिम प्रज्ञेमुळे नोकऱ्या जातील, ही भीती फेटाळून लावली होती. त्यांनी ही चर्चा मूर्खपणाची असल्याचे म्हटले होते. आता लगेचच दुकान कृत्रिम प्रज्ञेचा स्वीकार करीत कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे मंत्र्यांचा कृत्रिम प्रज्ञेबाबतचा अंदाज चुकल्याचे समोर आले आहे.