मुंबई: देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहारांची स्वीकारार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. सरलेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत व्यवहारांचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढून ९३.२३ अब्जांवर पोहोचले आहेत, असे वर्ल्डलाइनच्या ‘इंडिया डिजिटल पेमेंट्स’च्या ताज्या अहवालाने बुधवारी स्पष्ट केले.
अहवालानुसार, व्यवहार संख्या आणि व्यवहार मूल्याच्या बाबतीत फोनपे, गुगल पे आणि पेटीएम हे तीन यूपीआय मंच आघाडीवर आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये, या तीन ॲपचा वाटा सर्व व्यवहारांच्या संख्येच्या तुलनेत ९३ टक्के होता. व्यवहार मूल्याच्या बाबतीत, डिसेंबर २०२४ मध्ये त्यांचा वाटा ९२ टक्के राहिला आहे. २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर) ते २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत यूपीआय व्यवहारांच्या प्रमाणाची तुलना केली असता, ते ६५.७७ अब्ज वरून ४२ टक्क्यांनी वाढून ९३.२३ अब्जांवर पोहोचले आहेत. याच कालावधीत, व्यवहारांचे मूल्य ९९.६८ ट्रिलियन रुपयांवरून १३०.१९ ट्रिलियन रुपयांवर म्हणजेच ३१ टक्क्यांनी वाढले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. यूपीआय व्यतिरिक्त, डिजिटल देयक पर्यायाअंतर्गत इतर प्रकारांमध्ये क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड, मोबाइल पेमेंट आणि नेट बँकिंग यांचा समावेश आहे.
यूपीआय व्यवहारांचे वर्गीकरण व्यक्ती-ते-व्यक्ती (पी२पी) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (पी२एम) असे केले जाते. पी२पी व्यवहारांचे प्रमाण २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत २७.०४ अब्जावरून २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ३५.२१ अब्ज झाले आहे. तर पी२एम व्यवहारांचे प्रमाण ३८.७३ अब्जांवरून ५८.०३ अब्ज झाले, म्हणजेच ५० टक्के वाढले आहे.
वर्ष २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत सर्व यूपीआय व्यवहारांचा सरासरी आकार १,३९६ रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत १,५१५ रुपये अर्थात ८ टक्क्यांची घसरला आहे.
व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी ‘एआय’चा वापर
डिजिटल व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘एआय’चा वापर वाढवला आहे, असे एनपीसीआयचे मुख्य जोखीम अधिकारी विश्वनाथ कृष्णमूर्ती यांनी सांगितले. मार्चमध्ये यूपीआय व्यवहार १८.३० अब्जांपर्यंत पोहोचले, जे वार्षिक वाढीच्या ३६ टक्के आहे. त्यांचे व्यवहार मूल्य सुमारे २४ लाख कोटी रुपये होते, ज्यात २५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत, यूपीआयचा वापर वार्षिक ७४ टक्क्यांनी वाढला आहे, ज्यामुळे ती सर्वात मोठी किरकोळ देयक प्रणाली बनली आहे. फसव्या व्यवहारांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एनपीसीआयने हे पाऊल टाकले आहे. सुमारे ८५ टक्के ग्राहक हे फसव्या अमिषाला बळी पडत आहेत. तर १० टक्के ग्राहक भीतीमुळे आणि उर्वरित ५ टक्के अज्ञानामुळे फसगतीला बळी पडतात.