मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गुरुवारी जाहीर होणारे पतधोरण आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या सत्रात सावध पवित्रा अवलंबिला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आटलेला निधी ओघ आणि आशियाई-युरोपीय बाजारातील कमकुवत कल यामुळेही देशांतर्गत बाजारपेठेत निराशेचे वातावरण आहे.
मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०६.९८ अंशांनी घसरून ६५,८४६.५० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २००.८५ अंश गमावत ६५,७५२.६३ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६.४५ अंशांची घसरण झाली आणि तो १९,५७०.८५ पातळीवर स्थिरावला. बाजार विश्लेषकांच्या मते रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे राखले जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली. पतधोरण धोरण समिती गुरुवारी व्याजदर जाहीर करतील.
हेही वाचा >>> TCS आता GeM प्लॅटफॉर्मचा कायापालट करण्यासाठी मोदी सरकारला मदत करणार; नेमकी योजना काय?
जागतिक आघाडीवर, गुंतवणूकदार घटते रोखे उत्पन्न आणि चिनी निर्यातीतील लक्षणीय घट झाल्याने चिंतातूर झाले आहेत. तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू केला आहे, मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सक्रिय खरेदी सुरू असल्याने निर्देशांकातील घसरण मर्यादित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समभाग आणि औषधीनिर्माण कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तसेच व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांनी निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा >>> पेपरफ्रायचे सह संस्थापक आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचे निधन
सेन्सेक्सपॉवर ग्रिड, महिंद्र अँड महिंद्र, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, नेस्ले, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि आयटीसीच्या समभागात घसरण झाली. तर टेक महिंद्र, विप्रो, बजाज फायनान्स, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले.
सेन्सेक्स ६५,८४६.५० – १०६.९८ (-०.१६)
निफ्टी १९,५७०.८५ -२६.४५ (-०.१३)
डॉलर ८२.८४ ९
तेल ८४.१६ -१.३८