पीटीआय, नवी दिल्ली
देशातील आठ महानगरांत यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठ्यात घट नोंदविण्यात आली आहे. पहिल्या तिमाहीत ६९ हजार १४३ नवीन घरांचा पुरवठा झाला आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत हा पुरवठा १५ टक्क्यांनी कमी आहे.
बांधकाम क्षेत्रातील कुशमॅन अँड वेकफिल्ड या सल्लागार संस्थेने देशातील आठ महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जाहीर केला आहे. यानुसार बंगळूरु आणि मुंबई या शहरांत नवीन घरांचा पुरवठा वाढला आहे. मात्र, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांत नवीन घरांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत नव्याने सुरू झालेल्या गृह प्रकल्पांपैकी ३४ टक्के प्रकल्प आलिशान घरांचे आहेत. नवीन गृह प्रकल्पांमध्ये सूचिबद्ध आणि मोठ्या विकासकांचे प्रमाण ३८ टक्के आहे.
हेही वाचा >>> ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजार १४३ नवीन घरांचा पुरवठा झाला. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत तो ८१ हजार १६७ होता. बंगळूरुमध्ये नवीन घरांचा पुरवठा ७ हजार ७७७ वरून वाढून ८ हजार ८४८ वर पोहोचला आहे. तसेच मुंबईतही नवीन घरांचा पुरवठा १९ हजार ६३ वरून १९ हजार ४६१ वर पोहोचला आहे. पुण्यात गेल्या वर्षी नवीन घरांचा पुरवठा १३ हजार ८०६ होता. यंदा पहिल्या तिमाहीत तो ११ हजार ३५८ वर घसरला आहे. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा ४ हजार ९०१ होता, तो यंदा पहिल्या तिमाहीत ४ हजार ५२९ वर आला. चेन्नईत नवीन घरांचा पुरवठा ८ हजार १४४ वरून ५ हजार ४९० वर आला असून, दिल्लीत तो ७ हजार ८१३ वरून ३ हजार ६१४ वर घसरला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरापासून आलिशान आणि महागड्या घरांना मागणी वाढत आहे. घरांमध्ये ग्राहकांच्या वाढलेल्या गुंतवणुकीचे हे निदर्शक आहे. आगामी काळात मोठ्या विकासकांकडून आलिशान घरांचे प्रकल्प उभारण्याचे प्रमाण वाढत जाईल.- शालिन रैना, व्यवस्थापकीय संचालक (निवासी सेवा), कुशमॅन अँड वेकफिल्ड